निवडणुकीत आपल्या प्रचारासाठी ‘पेड न्यूज’चा अवलंब केल्याप्रकरणात काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार विश्वजीत कदम यांना आणखी एक धक्का बसला आहे. पेड न्यूजसंदर्भातील राज्य समितीनेही कदम यांच्यावर ठपका ठेवत त्यांची याचिका शनिवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेण्यावाचून कदम यांच्याकडे गत्यंतर नसून तेथेही विरोधात निकाल आल्यास कदम यांची उमेदवारीच गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.
मतदानासाठी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी विश्वजीत कदम यांच्याविरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता पेड न्यूज प्रकरणातही कदम अडचणीत सापडले आहेत. ‘प्रचंड खपाचे एकमेव निष्पक्ष आणि निर्भीड दैनिक’ असा पुढारपणा मिरवणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील एका दैनिकाच्या ५ एप्रिलच्या अंकात ‘कदम यांना दलित संघटनांचा पाठिंबा, काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला’ अशा मथळ्याखाली एक मोठी बातमी प्रसिद्ध झाली होती. कदम यांचा प्रचार करणारी ही बातमी म्हणजे ‘पेड न्यूज’चाच प्रकार असल्याचा ठपका जिल्हा समितीने ठेवला होता. त्याविरोधात कदम यांनी राज्यस्तरीय समितीकडे दाद मागितली होती. शनिवारी राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गद्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर या याचिकेची सुनावणी झाली. त्या वेळी सदर वृत्तपत्रात आपण कोणत्याही प्रकारची ‘पेड न्यूज’ दिलेली नाही. मात्र आपल्याला विविध दलित संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचे सांगत कदम यांच्या वकिलांनी त्याबाबत विविध १७-१८ संघटनांच्या पाठिंब्याची पत्रेही समितीला सादर केली.
पैशाच्या मोबदल्यात किंवा विशेष मेहरनजरेच्या मोबदल्यात छापलेली बातमी किंवा विश्लेषण अशी पेड न्यूजची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने व्याख्या केली असून कदम यांच्या संदर्भात छापण्यात आलेली बातमी या व्याख्येत बसत असल्याचा निष्कर्ष काढत राज्य समितीने कदम यांची याचिका फेटाळून लावली.
राज्य समितीचा निष्कर्ष : पैशाच्या मोबदल्यात किंवा विशेष मेहरनजरेच्या मोबदल्यात छापलेली बातमी किंवा विश्लेषण अशी ‘पेड न्यूज’ची व्याख्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने केली आहे. त्यानुसार कदम यांच्या संदर्भात छापण्यात आलेली बातमी या व्याख्येत बसते. त्यामुळेच कदम यांची याचिका फेटाळून लावण्यात आली असल्याचा निष्कर्ष राज्य समितीने काढला आहे. कदम यांच्याकडे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यावाचून पर्याय उरलेला नाही. मात्र, त्यातूनही त्यांना फारसा दिलासा  न मिळण्याचीच चिन्हे आहेत.