राष्ट्रीय आणि राज्य पुरस्काराने गौरविल्या गेलेल्या  लेखिका मधुगंधा कुलकर्णी सोबत मुक्त संवाद साधण्याची संधी आज बुधवारी व्हिवा लाउंजच्या निमित्ताने वाचकांना मिळणार आहे.
जगभरातील समीक्षकांनी गौरवलेल्या आणि सवरेत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय सन्मान मिळालेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाची या लेखिका. घराघरांत बघितल्या जाणाऱ्या लोकप्रिय मालिकेची कथाही त्यांचीच. याशिवाय सशक्त अभिनेत्री म्हणूनही तिची ओळख आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातील सर्जनशीलता, व्यावसायिकतेची बदलती गणिते, तरुण नाटककार-लेखिका म्हणून जाणवणारी आव्हाने अशा अनेक विषयांवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मधुगंधा यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारता येतील.
चित्रपट, नाटक, मालिका या सर्व माध्यमांमध्ये यशस्वीपणे वावरणाऱ्या लेखिका-अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी बुधवारी (६ मे)‘व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावर येणार आहे. ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेची पटकथा मधुगंधा यांची आहे, तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री म्हणून त्या प्रेक्षकांसमोर येतात. ‘लाली लीला’मधून त्यांच्यातील सशक्त अभिनेत्रीचे दर्शन यापूर्वीच झालेले आहे. कुमारवयातच लिहित्या झालेल्या मधुगंधा यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून प्रशिक्षण घेतले आहे. कादंबरी, कथा लिखाणाबरोबर नाटककार म्हणूनही त्या पुढे आल्या. ‘लग्नबंबाळ’सारखे गाजत असलेले नाटक मधुगंधाने लिहिले आहे. ‘होणार सून..’ मालिकेसाठी मधुगंधाने लिहिलेल्या कथेवरून प्रेरणा घेत हिंदी आणि कन्नड मालिकाही सुरू झाल्या आहेत.  
मधुगंधाचा आतापर्यंतचा प्रवास केसरी प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने उलगडणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

कधी – आज बुधवार, ६ मे
कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्कसमोर, दादर (प.)
वेळ – सायंकाळी
६ वाजता.