आपण दिलेले मत आपल्याच पसंतीच्या उमेदवाला मिळाल्याची खात्री करून घेण्याची मुभा आता राज्यातील मतदारांना मिळणार आहे. मतदान यंत्रात (एव्हीएम) फेरफार होण्याच्या शंका- कुशंकाना लगाम लावण्याबरोबरच मतदारांमधील संशयाचे मळभ दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदार संघात ‘व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपीईटी) प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असून मतदारांना त्यांनी कोणाला मतदान दिले आहे, ते लगेच कळणार असल्याची माहिती निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.  लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेलया घवघवीत यशाच्या पाश्र्वभूमीवर मतदान यंत्रेच सदोष असल्याचा संशय प्रदेश काँग्रेसने मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांच्याकडे व्यक्त केला होता. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशातील मतदानयंत्रांचा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात वापर करू नये, अशी विनंतीही आयोगास करण्यात आली होती. मात्र मतदानयंत्रे ही कोणत्याही राज्याच्या मालकीची नसून ती आयोगाच्या मालकीची आहेत आणि ती सुरक्षित असल्याने त्यात कोणताही फेरफार होत नसल्याचा खुलासा करीत आयोगाने काँग्रेसची मागणी फेटाळून लावली आहे. तरीही निवडणुकीदरम्यान मतदानयंत्रात गडबड झाल्याच्या वा भलत्याच उमेदवाराच्या नावावर मत नोंदले गेल्याच्या तक्रारी निवडणुकीत होतात.
या विधानसभा निवडणुकीत ‘व्हीव्हीपीईटी’ या सुविधेचा प्रायोगिक तत्त्वावर अवलंब करण्यात येणार आहे. राज्यातील १० ते १५मतदार संघांत याची अंमलबजावणी करण्यात येणार असून मतदारांना त्यांनी कोणाला मतदान केले आहे याची लगेच खातरजमा करता येणार आहे. मात्र मतदानाची स्लीप मतदाराला मिळणार नाही. त्यामुळे हे मतदान गोपनीय राहील, असे सूत्रांनी सांगितले.