डायक्लोफेनॅकच्या विक्रीवर र्निबध, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
निसर्गात स्वच्छता कामगाराची भूमिका बजावणाऱ्या गिधाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तथापि डायक्लोफेनॅक या वेदनाशामक औषधाचा वापर गुरांच्या आजारासाठी पशुवैद्यकांकडून करण्यात येत असल्याचा मोठा फटका गिधाडांना बसत आहे. मृत जनावरांच्या शरीरात भिनलेल्या डायक्लोफेनॅकमुळे गिधाडांची संख्या झपाटय़ाने कमी होऊ लागली असून गेल्या अडीच दशकात गिधाडांची संख्या चार कोटीवरून आता केवळ ६० हजार एवढी झाली आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने याबाबत गंभीर इशारा दिल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याची दखल घेऊन डायक्लोफेनॅकची वायल विक्री करण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गिधाडांच्या घटत्या संख्येला डायक्लोफेनॅक औषध जबाबदार असल्याचा इशारा पर्यावरण विभागाने यापूर्वीही दिला होता. मात्र, गिधाडांना कायदेशीर संरक्षण देण्याबाबत कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे त्याची फारशी दखल घेतली जात नव्हती. परिणामी ९०च्या दशकात चार कोटी संख्या असलेल्या गिधाडांची संख्या वेगाने कमी होत आता केवळ ६० हजार गिधाडेच उरली आहेत. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने राजपत्र प्रसिद्ध करून डायक्लोफेनॅक इंजेक्शन कुपीच्या घाऊक विक्रीवर बंदी लागू करून एकावेळी केवळ एकच कुपी घेता येईल असा आदेश जारी केला आहे.
केवळ गिधाडांनाच नव्हे तर गरुडांनाही या औषधाचा फटका बसल्याचे केंब्रिज विद्यापीठाच्या प्रेस जर्नलमधील संशोधनात स्पष्ट झाले आहे. या संशोधनात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, ब्रिटनच्या रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्षन ऑफ बर्डस् आणि इंडियन व्हेटर्नरी रिसर्च सोसायटी आदी पर्यावरण प्रेमी सस्थांचाही सहभाग आहे. अखेर केंद्रीय पर्यावरण व वने विभागाच्या ठाम शिफारशीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डायक्लोफेनॅकला चाप लावण्याचे आदेश दिले.

बंदी असूनही वापर..
प्राण्यांवरील उपचारांकरिता डायक्लोफेनॅकच्या वापरासाठी संपूर्ण बंदी असतानाही, माणसांवरील उपचाराकरिता अनेक कुप्यांचे पाकीट उपलब्ध आहे. प्राण्यांवरील उपचारांसाठी पशुवैद्यकांकडून या कुप्यांचाच मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. अशी औषधे दिलेली जनावरे मरण पावल्यानंतरही त्यांच्या शरीरात बराच काळ या औषधाचे अंश शिल्लक राहातात. अशा प्राण्याचे मांस खाल्यानंतर गिधाडांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले. भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांनी या औषधाच्या वापरावर २००६ मध्ये बंदी आणली होती. तथापि कायद्यातील पळवाटांचा वापर करून या औषधाचा वापर आजही सर्रास होत आहे.