गेली २५ वर्षे वसई-विरार पट्टय़ात वर्चस्व असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्याला आव्हान देण्याचे यापूर्वी अनेक प्रयत्न झाले, पण ते निष्फळ ठरले होते. यंदाही महापालिका निवडणुकीत ठाकूर यांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष रिंगणात उतरत असले तरी ठाकूर यांना आव्हान देणे कठीण असल्याचे मानले जाते.
वसई-विराmu03र महापालिकेची निवडणूक १४ जूनला होत असून, महानगरपालिका स्थापन झाल्यापासून गेली दहा वर्षे एकहाती सत्ता असलेल्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने सत्तेची हॅटट्रिक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. १९९० पासून एक अपवाद वगळता वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर विधानसभेत निवडून येतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकूर यांच्या आघाडीचा खासदार निवडून आला होता. महापालिकेत ठाकूर यांना शह देण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनता दल यांचा प्रयत्न असला तरी ठाकूर यांची पकड लक्षात घेता हे आव्हान विरोधकांनाही सोपे नाही. महानगरपालिका, तालुक्यातील जिल्हा परिषदेच सर्व मतदारसंघ, पंचायत समिती या साऱ्यांवर ठाकूर यांचे प्राबल्य
आहे.  
ठाकूर यांचे सर्वच राजकीय पक्षांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना ठाकूर आघाडीबरोबर होते. भाजपची सत्ता येताच तीन आमदार असलेल्या ठाकूर यांच्या पक्षाने भाजपला पाठिंबा दिला.
ठाकूर यांच्याबरोबर राहिल्याने वसईत पक्षाची वाढ खुंटली अशी कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.  ठाकूर भाजपबरोबर गेल्याने राष्ट्रवादीने वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे सोपाविली आहेत. राष्ट्रवादी चांगले यश मिळवेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या काही नेत्यांशी ठाकूर यांचे उत्तम संबंध असल्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांची पंचाईत होते. विधानसभेत पाठिंबा असल्याने भाजप ठाकूर यांच्या विरोधात जाणार नाही, अशी चिन्हे आहेत.
जनता दलाने समविचार पक्षांबरोबर आघाडी करण्याची तयारी केल्याचे पक्षाचे स्थानिक नेते मनवेल तुस्कानो यांनी सांगितले.