वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना नोटीस;१४ ऑगस्टपर्यंत मुदत

शुल्कवाढीच्या मुद्दय़ावरून चर्चेत असलेल्या बी.के.एल.वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाने १४ ऑगस्टपर्यंत प्रवेश शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील, अशी नोटीस गुरुवारी बजावली आहे. आर्थिकदृष्टय़ा न परवडणारी ८६ टक्के शुल्कवाढ कशी भरायची यासाठी विद्याथ्र्यी आणि पालक आता चिंतातुर झाले आहेत.

रत्नागिरी येथील बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांचे शुल्क ८६ टक्क्य़ांनी वाढविले आहे. वाढीव शुल्क  नियमबाह्य़ असून पालकांना परवडणारे नाही. मागील काही महिन्यांपासून पालक आणि शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंच या विरोधात शिक्षण शुल्क प्राधिकरणाकडे वारंवार तक्रार करीत आहेत. या संदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊनही पालकांनी तक्रार मांडली आहे. मात्र या गंभीर प्रश्नाबाबत कोणतीही हालचाल सरकारकडून केली गेली नाही. याचाच फायदा घेत आता महाविद्यालयाने १४ ऑगस्टपर्यंत प्रवेश शुल्क न भरल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, अशी नोटीस विद्यार्थ्यांना बजावली आहे.

दरम्यान, महाविद्यालयाने एम.सी.आय. मानांकाप्रमाणे १३७ पूर्णवेळ शिक्षकांची आवश्यकता असताना २५५ शिक्षक पूर्णवेळ काम करत असल्याचे दाखविले आहे. मात्र प्रत्यक्षात महाविद्यालयामध्ये केवळ ४१ शिक्षक शिकवीत असल्याचे आढळून आले आहे. ५६ पूर्णवेळ काम करणारे शिक्षक असल्याचे दाखवीत महाविद्यालयाने यांचा ११ कोटींहून अधिक रक्कम यांच्या पगारावर खर्च होत असल्याचे शिक्षण शुल्क समितीकडे सादर केले आहे. त्यामुळे हा वाढता खर्च पाहून समितीनेही शुल्क वाढीला मान्यता दिल्याचे समोर आले आहे. शिक्षकांची २५५ संख्या ही सोडून गेलेले आणि नवीन रुजू झालेले अशी मिळून आहे, असा खुलासा महाविद्यालयाच्या संचालिका सुवर्णा पाटील यांनी केला आहे.

महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांशी रविवारी पालकासोबत झालेल्या बैठकीमध्ये शुल्क कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन महाविद्यालयाकडून देण्यात आले. मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी ही नोटीस तयार करण्यात आली. शिक्षण शुल्क समितीनेही यासंदर्भात चौकशी समिती नेमली असून चार आठवडय़ांचा वेळ समितीला दिला असल्याचे महिनाभरापूर्वी आम्हाला तोंडी सांगितले होते. त्यामुळे आत्तापर्यत आमच्या हाती आश्वासनांशिवाय काहीही लागलेले नाही. तेव्हा आता आम्ही महाविद्यालयाच्या बेकादेशीर शुल्कवाढीविरोधात लवकच न्यायालयात याचिक दाखल करणार आहोत, असे एका पालकांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले.

पहिल्या वर्षी प्रवेश घेतानाच आम्ही महाविद्यालयाचे शुल्क सात लाखापर्यत वाढू शकते, असे तोंडी सांगितले होते. भविष्यातील वाढीव शुल्क भरणे आम्हाला मान्य असेल, असे प्रतिज्ञापत्रही पालकांनी आम्हाला लिहून दिले आहे.  परंतु आता पालक उगाचच शुल्कवाढ झाल्याचे सांगत शुल्क भरण्यास नकार देत आहेत. १६ ऑगस्टपासून दुसरे वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे त्याआधी विद्यार्थ्यांना हे शुल्क भरावेच लागणार आहे, असे सुवर्णा पाटील यांनी सांगितले आहे.

१५ लाखांचे वाढीव शुल्क

एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांच्या ४ लाख ९ हजार रुपये या शुल्काऐवजी आता विद्यार्थ्यांना ७ लाख २५ हजार रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. प्रत्येक वर्षीचे शुल्क ३ लाख १६ हजाराने वाढल्यामुळे साडेचार वर्षांच्या वैदकीय शिक्षणाच्या खर्चामधील जवळपास १५ लाखांचे वाढीव शुल्क कसे भरायचे याची चिंता आता पालकांना लागली आहे.