मनसेच्या नगरसेवकांचा आरोप; एकच वाहन एकाच वेळी दोन ठिकाणी कचरा वाहून नेत असल्याच्या नोंदी

नालेसफाई, रस्त्यापाठोपाठ आता मुंबईमधील कचरा वाहून नेण्याच्या कामातही घोटाळा झाल्याचे मनसेच्या नगरसेवकांनी उघडकीस आणले आहे. मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी परिसरात एकाच वेळी एक वाहन दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये कचरा वाहून नेत असल्याच्या नोंदी आढळल्या असून कंत्राटदारांनी कचरा वाहून नेण्याच्या कामात ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप मनसेने केला आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. परंतु चौकशीत अनेक मुद्दय़ांना बगल देण्याचा आरोप करत मनसेच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

मुंबईमध्ये दररोज नऊ हजार मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा होतो. हा कचरा कचराभूमींपर्यंत वाहून नेण्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. मुलुंड, भांडूप, विक्रोळी आदी परिसरात १४ कंत्राटदारांना कचरा वाहून नेण्याचे ९०० कोटी रुपयांचे काम २०१२ ते २०१७ या पाच वर्षांसाठी देण्यात आले होते. विभागामध्ये नियमितपणे कचरा वाहून नेण्यात येत नसल्यामुळे मनसेच्या नगरसेविका सुजाता पाठक यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. एकच वाहन एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये कचरा वाहून नेत असल्याच्या नोंदी त्यांना पालिका दरबारी आढळल्या. तर एक गाडी विभागात कचरा उचलत असताना, त्याच वेळी ती कचराभूमीवर कचरा टाकत असल्याची नोंद आढळली. अशा पद्धतीचा वापर करून प्रत्यक्षात कचरा न उचलता पालिकेकडून पैसे उकळण्याचे काम कंत्राटदार करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तात्काळ पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे तक्रार केली होती.

या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांवर कोणतीच कारवाई झाल्याचे आढळून न आल्यामुळे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत या घोटाळ्याचा गौप्यस्फोट केले.

कंत्राटदाराचे एक वाहन एका विभागात कचरा उचलत असल्याची नोंद पालिकेकडे करण्यात आली आहे. पण त्याच वेळी वाहन योग्य स्थितीत असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हे वाहन आरटीओमध्ये दाखल असल्याची नोंद आहे. अशा पद्धतीने कचरा वाहून नेण्याच्या कामात कंत्राटदारांनी घोटाळा केला आहे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत आठ गट तयार करण्यात आले होते. निविदा प्रक्रियेत दोन सख्ख्या भावांनी दोन स्वतंत्र निविदा भरल्या होत्या. त्यापैकी एकाला काम मिळाले आहे. काम मिळविण्यासाठी यातही घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. तसेच नालेसफाईमध्ये दोषी आढळलेल्या दोन कंत्राटदारांना ही कामे देण्यात आली आहेत. ही कामे दिली तेव्हा नालेसफाई घोटाळा उघडकीस आला नव्हता. परंतु नालेसफाईत दोषी आढळल्यानंतर या दोन्ही कंत्राटदारांकडून पालिकेची सर्व कामे काढून का घेतली नाहीत, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

अतिरिक्त आयुक्त निरुत्तर

नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांना देता आली नाहीत. अखेर पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत या प्रकरणी उत्तर सादर करावे, अन्यथा या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले जातील, असा इशारा स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिला.