वाहतूक पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडिओ बदलापूरमध्ये व्हायरल झाला असून या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही याची दखल घेत व्हिडिओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘दंडाच्या पावतीचे पैसे घेतल्याचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्याकडून देण्यात आले असून या व्हिडिओचा तपास सुरु आहे’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

अंबरनाथ- बदलापूर या शहरांचा विकास झपाट्याने होत असून शहरांमधील वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. दुसरीकडे पोलीस नगरपालिका मुख्यालय, दत्त चौक, ग्रामीण रूग्णालय, बदलापूरचे बेलवली येथील प्रवेशद्वार आणि एरंजाड अशा ठिकाणी तपासणी करतात. पण ही नाकाबंदी म्हणजे लाचखोरीचा अड्डा आहे की काय असा प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बदलापूर पश्चिमेतील एरंजाड येथील प्रवेशद्वाराजवळ एक वाहतूक पोलीस वाहनचालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वाहतूक पोलिसाचे नाव दिलीप साळुंखे असल्याचे समजते.

वाहतूक पोलीस लाच स्वीकारत होता का यावर पोलिसांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. ‘आमच्या हाती व्हिडिओ लागल्यानंतर आम्ही कारवाईसाठी चौकशीला सुरूवात केली आहे. दंडाच्या पावतीचे पैसे घेतल्याचे स्पष्टीकरण पोलिसाने दिले आहे. मात्र तरीही तपास सुरू असून दोषीवर कारवाई केली जाईल. असेप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे अंबरनाथमधील वाहतूक पोलीस निरीक्षक दिपक गुजर यांनी सांगितले.