रणरणते ऊन आणि त्यातून होणारे बाष्पीभवन, पाण्याचा वाढलेला वापर यातून जलाशयांमधील पाण्याचा साठा आटू लागला असून, गेल्या आठवडाभरात जलाशयांमधील पाण्याचा साठा तीन टक्क्य़ांनी घटला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा जलाशयांमध्ये क्षमतेच्या २९ टक्के साठा शिल्लक आहे. तुलनेत मुंबई व ठाण्याला पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे.

बाष्पीभवनामुळे कडक उन्हात पाण्याचा साठा कमी होतो. त्यातच पाण्याचा वापर वाढला आहे. गेल्या रविवारी पाण्याचा साठा ३२ टक्के होता. मात्र, त्यात तीन टक्के घट होऊन साठा २९ टक्क्य़ांवर आला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जलाशय भरले होते. यामुळेच यंदा कडक उन्हाळा असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अपवाद वगळल्यास तेवढा गंभीर बनलेला नाही. जूनअखेर किंवा जुलैच्या सुरुवातीपर्यंत हा साठा पुरविण्याचे जलसंपदा विभागापुढे आव्हान आहे. पाण्याचा साठा आणि होणारा वापर याचा अंदाज घेऊन पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून केले जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलअखेर १३ टक्के साठा होता. या तुलनेत यंदा साठा समाधानकारक आहे. पुणे आणि नागपूर विभाग वगळता अन्य चार विभागांमध्ये पाण्याची परिस्थिती बरी आहे. कोकणात तर अजूनही ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त साठा आहे.

विभागनिहाय पाण्याचा साठा

  • कोकण (५४.१५ टक्के), अमरावती (३३.०६ टक्के), नागपूर (१५.८० टक्के), नाशिक (३०.४६ टक्के), पुणे (२२.९३ टक्के), मराठवाडा (३३.२८ टक्के).

मुंबई, ठाण्याला पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा

  • भातसा (४५.४६ टक्के), बारवी (४५.७५ टक्के), मध्य वैतरणा (९० टक्के), मोडक सागर (८९ टक्के), तानसा (८० टक्के), वैतरणा (५३ टक्के)