‘अनुभव मुंबई’ उपक्रमांतर्गत पाणी वाचवा मोहीम; सामाजिक कार्याचे शिक्षण देणाऱ्या ‘निर्मला निकेतन’च्या अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग
दुष्काळाच्या सावटाने संपूर्ण मराठवाडय़ाला पछाडले असताना मुंबईतील सुमारे १० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घराघरांमधून पाण्याची जमवाजमव करून बीड जिल्ह्य़ातील मानखुर्दवाडी या दुष्काळग्रस्त गावाला पाण्याची मदत केली आहे. सामाजिक कार्याचे शिक्षण देणाऱ्या निर्मला निकेतन या महाविद्यालयाच्या ‘अनुभव मुंबई’ या उपक्रमाअंतर्गत ‘पाणी वाचवा’ या मोहिमेमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी प्रत्यक्ष लोकांच्या घरोघरी जाऊन साधारण १५ हजार लिटर पाणी जमा केले. मुंबईतील ‘अनुभव मुंबई’ या युवक संस्थेने मराठवाडय़ातील नागरिकांना मदत करून माणुसकीचे एक वेगळेच दर्शन घडवून दिले आहे.
‘गोरेगाव जनभागीदारकडून एक बॉटल पाण्याचे योगदान, वाचवेल मराठवाडय़ाचे प्राण..’ अशी घोषणा देत अनुभव मुंबई या संस्थेत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांना तब्बल १५००० लिटर पाणी पाठवून संवेदनशीलता जपली आहे.
अनुभव संस्था सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करीत आहे. दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावयाची इच्छा संस्थेच्या बैठकीत मांडण्यात आली मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे मुंबईतील वेगवेगळ्या महाविद्यालयांना यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. यामध्ये विवेक, केईएम, डीटीएसएस, विद्या विकास महाविद्यालय आणि निर्मल निकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २० एप्रिलला शहरातील इमारती आणि मंडळांना मराठवाडय़ातील जनतेला पाण्यासाठी मदत करावी अशी पत्रके पाठविण्यात आली. यानंतर संस्थेतील विद्यार्थी गटागटाने इमारती, वस्त्यांमध्ये गेले आणि त्यांना दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले. यावेळी रहिवाशांबरोबर उपाहारगृहाच्या मालकांनीही पाण्याची मदत केली.
मदत करण्यासाठी पाणी कशाप्रकारे दुष्काळग्रस्त भागाला पाठवावे हा प्रश्न होता. त्यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा आणि गॅलनचा पर्याय निवडला आणि पाणी मिळविण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. बाटल्या जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानिकांना एक बाटली पाणी दुष्काळग्रस्त भागातील लोकांना देण्याचे आवाहन केले. रहिवाशांनीही स्वखुशीने मदत दिली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर एका खोलीमध्ये हे पाण्याचे गॅलन, बाटल्या जमा करण्यात आल्या. त्याची मोजणी करून ट्रकच्या माध्यमातून मानखुर्दवाडी गावाला पाठविण्यात आले.
पाण्याची योग्य तऱ्हेने विभागणी केली जावी यासाठी गावातील एका व्यक्तीला समन्वयक नेमण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने हे पाणी गावकऱ्यांपर्यंत पोहोचविले गेले. असे अनुभव मुंबई या संस्थेच्या स्वाती राणे यांनी सांगितले. पाणी जमा करण्याचा अनुभव सांगताना स्वाती यांनी गोरेगाव भागातील अनुभव सांगितला. गोरेगाव भागातील मुस्लीम बांधवांनी मशिदीच्या भोंग्यांतून लोकांना पाणी देण्याचे आवाहन केले. त्यामुळे सर्वात जास्त पाण्याची मदत राम मंदिर येथील मुस्लीम बांधवांकडून झाल्याचे स्वाती राणे यांनी सांगितले.