सध्या पावसाने दडी मारल्यामुळे पालिका अधिकारी चिंतेत पडले आहेत. जुलैअखेपर्यंत पाऊस पडला नाही, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत दिले. मुंबईत सध्या अनेक भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने नगरसेवकांना अंधारात ठेवून १० टक्के पाणीकपात लागू केल्याचा आरोपही करण्यात आला.
मुंबईतील चाळी, झोपडपट्टय़ा आणि टेकडय़ांवरील भागांमध्ये सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांच्या तक्रारी सुरू असताना पालिका अधिकारी कोणतीच माहिती देत नाहीत. पाणीचोरी आणि गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे, असे प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर आणि नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी केला. मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केल्याचे काही अधिकारी सांगत आहेत, त्यात तथ्य आहे का, अशी विचारणाही काही नगरसेवकांनी केली. जुलैमध्ये पाऊस झालाच नाही, तर पाणीपुरवठा कसा करणार, असा सवाल काही नगरसेवकांनी केला. पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार याची मुंबईकरांनाही कल्पना आहे. त्यामुळे आता १० टक्के पाणीकपात लागू करावी, असे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सूचित केले.
पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीकपातीची गरज नाही; परंतु पाऊस पडलाच नाही, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.