रेल्वे, रुग्णालये, हॉटेल, बांधकाम प्रकल्प अडचणीत
पाणीकपातीमुळे टंचाईला तोंड देणाऱ्या मुंबईतील अनेक भागांसाठी आधार ठरत असलेला टँकरचा पाणीपुरवठा मंगळवारपासून बंद झाला आहे. पाणीमाफियांवर कारवाई करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात टँकर असोसिएशनने सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने मंगळवारी शहरातील अनेक मोठी गृहसंकुले, रुग्णालये, शासकीय-खासगी कार्यालये, हॉटेल यांना अडचणींना तोंड द्यावे लागले.
मुंबईतील विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याचा उपसा करून टँकर माफिया हे पाणी दामदुप्पट दरांत विकत असल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या तक्रारीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पालिकेने टँकरमध्ये पाणी भरण्याच्या ठिकाणांवर छापे मारण्यास सुरुवात केली. या कारवाईत गैरप्रकार करताना आढळणाऱ्यांना पंप हटवण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर याठिकाणचे पंप जप्त करण्यात येत होते. तसेच काही ठिकाणी कूपनलिका बुजवण्याची कारवाईही करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर टँकरचालकांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला.
मुंबईमध्ये तब्बल २,५०० टँकर असून एका टँकरमध्ये सुमारे १० हजार लिटर पाणी सामावले जाते. दर दिवशी एका टँकरच्या सुमारे आठ म्हणजे २,५०० टँकरच्या २० हजार फेऱ्या होतात. या टँकरमधून मुंबईत दिवसभरात २० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबईतील टँकरवाले संपावर गेल्याने रेल्वे, हॉटेल, कार्यालये, रुग्णालये, बांधकामस्थळे आदी ठिकाणी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
विहिरी, कूपनलिकांमधील पाण्याची विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गेली २० वर्षे सातत्याने करण्यात येत आहे. पण पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मुंबईत २०१० मध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी या मागणीचा विचारही करण्यात येत होता. पालिकेने हे पाणी विकण्याची परवानगी दिल्यास आवश्यक ते शुल्क भरायला आम्ही तयार आहोत, असे मुंबई टँकर असोसिएशनचे सदस्य राजेश ठाकूर यांनी सांगितले.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांना फटका
मुंबईमधून बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांमधील शौचालये आणि बेसिनसाठी टँकरचे पाणी वापरले जाते. दर दिवशी सुमारे २५० टँकरमधून विविध रेल्वे स्थानकांवर पाणी पोहोचते केले जाते, मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे मंगळवारी रेल्वेला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांमध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.