मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने जलसाठय़ाची स्थिती चिंताजनक झाली आहे. परिणामी, मुंबईत पाणीकपात करून वर्षभरातील पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक आखण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे. स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा प्रशासनाकडून होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांना पुढील वर्षभरात मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्यक आहे. शुक्रवारी तलावांमध्ये ९,३६,७८४ दशलक्ष लिटर पाणी असून त्यामुळे मुंबईकरांची २४९ दिवस तहान भागू शकेल. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांत १३ लाख दशलक्ष पाणी होते. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांत पावसाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये तलावांत समाधानकारक भर पडलेली नाही. त्यामुळे पाणीकपात अटळ झाल्याचे जल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस पडला आणि तलावांची स्थिती सुधारली तर पाणीकपातीचा निर्णय मागे घेता येईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
तलावांतील पाणी स्थिती (दशलक्ष लिटरमध्ये)

तलाव २०१५ २०१४
मोडकसागर १,१७,७०६ १,२५,९२०
तानसा १,०८,४३६ १,४३,०६३
विहार ११,३७२ २६,६५३
तुळशी ७,५५३ ८,०२३
अप्पर वैतरणा १,००,६८६ १,८७,९०५
भातसा ४,०३,७०२ ६,१५,३६४
मध्य वैतरणा १,८७,३२९ १,९३,४७९
एकूण ९,३६,७८४ १३,००,४०७