काँग्रेस, समाजवादी, भाजपचा स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ

मालमत्ता करमाफीबाबत आग्रह असलेल्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने २०१२-१३ मध्ये पाणीपट्टीत सरासरी आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याबाबत प्रशासनाला दिलेले अधिकार काढून घेण्याबाबत काँग्रेसने गुरुवारी स्थायी समितीमध्ये सादर केलेला प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्षांनी फेटाळून लावला. त्यामुळे पाणीपट्टीमध्ये करण्यात आलेल्या सरासरी ५.३९ टक्के दरवाढीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ घातला. सत्ताधारी दमनशक्तीचा वापर करीत असल्यामुळे भाजपच्या पहारेकऱ्यांनीही काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला. विरोधक आणि भाजप नगरसेवक सभात्याग करण्याच्या बेतात असल्याचे पाहून स्थायी समिती अध्यक्षांनी बैठकच गुंडाळली.

पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती असताना सुबोध कुमार यांनी जल खात्याच्या प्रकल्पांसाठी लागणारा निधी उभारण्याकरिता पाणीपट्टीमध्ये सरसकट आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव २०१२-१३ च्या अर्थसंकल्पामध्ये मांडला होता. पालिका सभागृहाने या प्रस्तावासह अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे जल खात्याच्या खर्चात होणारी वाढ लक्षात घेऊन सरसकट आठ टक्क्यांपर्यंत पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचे अधिकार प्रशासनाला मिळाले आहेत. त्यानुसार प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये सरासरी ५.३९ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आणि त्याबाबतचे निवेदन गेल्या आठवडय़ात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केले. मात्र या निवेदनाला नगरसेवकांनी विरोध केला आणि त्याबाबत रीतसर प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली होती.

सुबोध कुमार यांनी २०१२-१३ च्या अर्थसंकल्पासोबत मांडलेल्या मूळ प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत सादर केला होता. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी रवी राजा यांचा प्रस्ताव पुकारला आणि चर्चेविनाच फेटाळून लावला. एकीकडे ५०० चौरस फुटांचे क्षेत्रफळ असलेल्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन मुंबईकरांना देणाऱ्या शिवसेनेने पाणीपट्टीत ८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याबाबत प्रशासनाला दिलेले अधिकार काढून घेण्याबाबत मांडलेला प्रस्ताव फेटाळून लावला. शिवसेना मुंबईकरांची फसवणूक करीत आहे, अशी टीका रवी राजा यांनी केली. रमेश कोरगावकर यांनी बोलण्याची संधी नाकारल्याने काँग्रेस व सपाच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ घातला. काँग्रेसने मांडलेल्या प्रस्तावावर किमान चर्चा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. मात्र सत्ताधारी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. स्थायी समिती अध्यक्षांच्या दमनशाहीचा काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी पार्टी आणि भाजपने निषेध करीत सभात्यागाची घोषणा केली. मात्र भाजप व विरोधक सभात्याग करण्यापूर्वी कोरगावकर यांनी बैठक संपल्याचे घोषित केले.

मुंबईकरांच्या खिशात हात घालणे मान्य नाही

पालिकेच्या इतिहासामध्ये आजचा दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. सत्ताधारी पाणीपट्टी दरवाढीचे समर्थन करीत आहे. पालिकेचे ६१ हजार कोटी रुपये बँकेत ठेव स्वरूपात ठेवले आहेत; पण भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकडून पैसे घेतले जातात. पाणीपट्टी वाढविण्यात येणार असेल तर त्याविरोधात आवाज उठविला जाईल. विनाकारण मुंबईकरांच्या खिशात हात घालणे भाजपला मान्य नाही, असे मनोज कोटक यांनी सांगितले.