30 May 2016

आम्ही राक्षस झालोत!

खरं बोलण्याची कुवत नसणाऱ्यांनी खरं ऐकूसुद्धा नये ते अजून षंढ बनतात. स्वातंत्र्य मिळून ६५ र्वष झाली. खरं तर

प्रतिनिधी, मुंबई | January 13, 2013 3:01 AM

खरं बोलण्याची कुवत नसणाऱ्यांनी
खरं ऐकूसुद्धा नये
ते अजून षंढ बनतात.
स्वातंत्र्य मिळून ६५ र्वष झाली.
खरं तर दुसऱ्या पारतंत्र्याला ६५ र्वष झाली.
साहेब इंग्लंडला गेला हे बरं झालं की वाईट?
६५ वर्षांत पाण्यासारखी मूलभूत गरज पूर्ण होत नसेल तर स्वतंत्र भारतातल्या ‘मी’ने काय करायचं?
३० कोटींची १३० कोटी डोकी झाली.
स्वतंत्र भारत तेवढाच आहे. पुढचे १०० कोटी कुठं राहणार?
अन्न, वस्त्र, निवारा कुठून देणार?
तो मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची वृत्ती वाढणार. जबाबदार कोण?
मीच दुर्लक्षित केलेला प्रश्न आज काळ बनून समोर उभा आहे आणि तरीसुद्धा मी इतका उदासीन का भवतालासंबंधात? इतका बेदरकार कधी झालो मी?
लहानपणी पोलीस दिसला की मी पटकन सलाम करायचो पोलिसाला. त्या खाकी रंगाची जरब वाटायची, आदरयुक्त भीती वाटायची आणि आधारसुद्धा. दोन्ही बाजूंनी ते नातं का संपलं?
दिल्लीतला सामूहिक बलात्कार.
त्यानंतरसुद्धा तशाच प्रकारच्या बातम्या, वारंवार.
त्यावर उपाय म्हणून अनेक मतं.
फाशी द्यावी, शिस्न कापावे, हात-पाय तोडावेत. गोळ्या घालाव्यात.
मलासुद्धा प्रथम तसंच वाटलं. मुळात हा असा प्रकार घडतोच कसा? त्या मुलीच्या ठिकाणी मला माझी बहीण, मुलगी का दिसत नाही?
अशी अमानवी वृत्ती यांच्यात कुठून आली?
संस्कारात कुठे कमतरता आली का?
आई-बाप म्हणून आम्ही कमी पडतोय का?
चंगळवाद वाढतोय का?
कदाचित उद्याची शाश्वती नाही म्हणून आज नागवले जातोय का?
विकृती कुठल्या टोकाला पोहोचलीय!
अशा घटना घडत असताना मी तिथे असलो तर गप्प का बसतो? तेव्हा जर मी मधे पडलो तर उद्या मला मेणबत्ती पेटवावी लागणार नाही.
कदाचित असं करत असताना समोरचा भोसकेल मला ही भीती. भोसकू दे एकदाच. मधे न पडता गप्प घरी जाणाऱ्या मला रात्र झोपू देत नाही. त्या काळोखात माझं षंढत्व पुन:पुन्हा भोसकतं. आणि मग मी रोज थोडा थोडा मरत राहतो. कधीपासून मी असा मरायला लागलो, हे आठवत नाही; पण आता घरघर लागलीय! शेवटची का?
सगळी संवेदनशीलता गोठून गेलीय. माझ्यासकट आसपासची, विद्वानांची, राजकारण्यांची, तत्त्ववेत्यांची! आभाळाकडे बघून बोंब मारावी का?
सगळीकडे नुसत्या ढाली. तलवारी कुणाकडेच नाहीत. गंजल्या, गहाण टाकल्या, किंवा मनगटाला पेलवत नाहीत.
आज साहेबाची खूप आठवण येते.
वडील म्हणायचे साहेबाच्या वेळी असं नव्हतं, साहेबाच्या वेळी तसं नव्हतं. साहेबाचा धाक होता.
साहेबाच्या वेळी लोक कायदा पाळायचे. माझ्या जन्माआधी तीन र्वष साहेब बोटीत बसला. साहेबाला मी पुस्तकातच भेटलो.
साहेब पुन्हा आला तर? मला वाटतं, साहेब पुन्हा आला तर कदाचित आम्ही पुन्हा एक होऊ. आज जे विसविशीत झालंय सगळं, ते छान घटमूट होईल. पुन्हा एखादा गांधी, पुन्हा एखादा टिळक. पुन्हा तेच वारं सगळ्यांच्या अंगात जात-धर्म विसरून. त्याच प्रभात फेऱ्या. तीच देशप्रेमाची गाणी. सगळं माझ्या बापसाच्या वेळचं. तीच आपुलकी. तोच विश्वास. साहेबानं आम्हाला त्याच्या नकळत किती दिलंय त्यालाच माहीत नाही.
साहेबा, तुझ्यामुळे आम्ही एक होतो रे! तू गेलास आणि आम्ही दुभंगलो. विश्वास संपला. प्रेमाची जागा भीतीनं घेतली. सणांचा धसका वाटतो. दिवाळी रोजचीच झालीय. कधी कुठे काय फुटेल कळत नाही. सकाळी घरातून गेलेला संध्याकाळी कावळा बनून पिंडाला शिवायला येणार की काय, अशी भीती. कोणाबद्दल भरवसा राहिला नाही. मला कोण सांभाळणार? मग मीच बंदूक घेऊन जंगलाच्या दिशेने धावायला लागलो तर? मग मला मारायला माझेच राखीव दल येईल, पोलीस येतील. मला नक्षलवादी म्हणून मारतील. मग त्यांच्या छातीवरची बिरुदं वाढतील. ये साहेबा, मला मरायचं नाही रे. जगायचंय! साधं सोपं आयुष्य. मला हसायचंय. पुन: पुन्हा हसायचंय. पण मला हसू दिलं नाही तर मी बंदूक उचलणार! गांजल्यावर काय करणार रे मी? कदाचित मी जंगलाकडे धावणारच नाही. या इथंच, जिथं भली थोरली जिवंत माणसांची थडगी बांधलीत १००-१०० मजली, त्या थडग्यांच्या जंगलात माझ्या थडग्याची जागा शोधत जगत राहणार. मी रीता रीता झालोय रे साहेबा.
मला पुन्हा चेतवायला तू येतोस का रे?
माझ्या ढुंगणावर लाथा घालायला ये की रे! तुझ्या चाबकाचे रक्ताने भरलेले वळ माझ्या पाठीवर उमटवायला तूच पाहिजेस रे. इथं सगळे मानवतावादी भरलेत. मला तुडव आणि पुन्हा एकदा माणूस बनव.
नव्यानं मला सगळे अर्थ शिकवायला ये. सगळी नाती शिकवायला ये. मला पुन्हा ‘ग म भ न’ शिकायचंय. मी सगळं विसरलोय. मुळाक्षरं पुन्हा गिरवायला हवीत.
माझ्या जनावरांना, शेताला पाणी मिळेल. मी आत्महत्या करणार नाही. मी पुन्हा गाणी म्हणणार. माझी कारभारीण पुन्हा टोपलीत भाकर-झुणका घेऊन येणार. बैलाच्या गळ्यातल्या घंटांना किनरा निनाद सापडणार. गोफणीच्या भिरकावणीनं फुर्र्र झालेला पक्षी बुजगावण्याच्या डोक्यावर बसणार. तुझी टोपी खूप छान दिसायची, असं माझा बापूस म्हणायचा. तू आलास की मी ती पळवेन आणि माझ्या बुजगावण्याला घालेन. मग पाखरंसुद्धा घाबरतील. साहेबा, तू असताना आम्ही लाचार होतो, पण माणूस होतो. आज तू गेल्यावर आम्ही सगळे स्वतंत्रपणे राक्षस झालोत. खूप दिवसांत मी माणूस पाहिला नाही रे.
मला पुन्हा एकदा समोरच्याच्या डोळ्यात माणूस पाहायचाय, पण त्यासाठी तूच हवास.
साहेबा, हे निमंत्रण दीडशे वर्षांसाठी नाही.
अगदी जुजबी.
गणपतीसुद्धा १० दिवस पुजून ११ व्या दिवशी आम्ही बुडवतो, तेव्हा ते लक्षात ठेव.
आमचे आम्ही आम्हाला सापडलो की तू निघायचंस. आमंत्रणाचा अव्हेर करू नकोस.
तैनाती फौजेची कलमे मला ठाऊक आहेत.

First Published on January 13, 2013 3:01 am

Web Title: we became devil
टॅग Devil,Freedom