आपडे तो मोदीमाटे व्होट करवानू.. आपडे मोदीना जोयीएछे.. आलिशान गाडय़ांमधून सकाळीच गुजराती भाषक सहकुटुंब एखाद्या समारंभाला आल्यासारखे मतदान केंद्रांवर येत होते. हे चित्र होते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील.. केंद्रीय मंत्री देवरा कुटुंबीयांचा हा पारंपरिक मतदारसंघ. येथे मुस्लीम आणि गुजराती-मारवाडी मतदारांच्या विश्वासावर अनेक वर्षे हा मतदारसंघ काँग्रेस राखून आहे. या वेळी चित्र बदलेल, असे दिसते. मराठी मतांबरोबरच गुजराती मतदारही मोदींसाठी एकवटलेला दिसतो. विशेषत: मलबार हिल, मुंबादेवी, गिरगाव येथे सकाळीच मतदान केंद्रांवर मोठय़ा संख्येने गुजराती भाषक मतदानासाठी येत होते.
मोदीनामाचा जप सेनेकडूनही मोठय़ा प्रमाणात करण्यात आला, तर मनसेनेही गुजराती व हिंदी भाषेत प्रचार करत अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. गिरगावमध्ये अनेक केंद्रांवर सकाळी ११.०० पर्यंतच भरघोस मतदान होऊन गेले होते. असे चित्र प्रथमच पाहायला मिळाल्याचे येथील मनसेचे उपविभाग अध्यक्ष श्रीधर जगताप यांनी सांगितले. परिणामी आम्हाला नंतर काही कामच राहिले नाही, अशी प्रतिक्रियाही जगताप यांनी व्यक्त केली. मुंबईत आणि दक्षिण मुंबईतही सरासरी ५५ टक्के मतदान झाले. मुस्लीम समाज मोठय़ा प्रमाणात मतदानाला उतरेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही, असे सेना-मनसेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मोठय़ा प्रमाणावर उतरलेला गुजराती मतदार मिलिंद देवरा यांनाच मतदान करेल, असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे, तर त्यांच्या आपापसातील चर्चेवरून त्यांनी मोदींसाठी मतदान केल्याचा युतीचा दावा आहे.  
 याच्याउलट भेंडीबाजार, नागपाडा, पायधुनी, डोंगरी आदी परिसरांत या वेळी मुस्लीम मतदार कमी उतरल्याचे दिसून येत होते. एरवी सायंकाळी चारनंतर या भागात मुस्लीम मतदारांच्या ज्या रांगा लागतात तशा रांगा गुरुवारी दिसल्या नाहीत, असे येथे बंदोबस्तासाठी असलेल्या काही पोलिसांनी सांगितले.
लालबाग, परळ आणि गिरगाव या मराठी पट्टय़ातही मराठी मतदारांनी सायंकाळी मोठय़ा प्रमाणात मतदान केले.