नवी मुंबई येथील विमानतळ आणि शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर िलक हे दोन्ही प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
महाराष्ट्र आíथक विकास मंडळाच्या ११व्या धनंजयराव गाडगीळ स्मृती व्याख्यानामध्ये ‘भविष्यातील महाराष्ट्राच्या आíथक विकासाचा आराखडा’ या विषयावर मुख्यमंत्री बोलत हेाते. परदेशातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. ‘मेक इन महाराष्ट्र’शिवाय ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. त्याचबरोबर राज्यात उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना आखल्या आहेत. उद्योगांमधील इन्स्पेक्टरराज संपवून उद्योगाभिमुख व पारदर्शक धोरण अवलंबिले आहे. उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या ८० परवान्यांची संख्या २५ पर्यंत कमी करण्यात आली आहे. हॉटेल उद्योगासाठी लागणारे १८० परवाने आता २०पर्यंत कमी करण्यात येणार आहेत. उद्योगांना वीज दर कमी करण्यासाठीही शासन लवकरच पावले उचलणार आहे.
सर्व शेतकऱ्यांना २०१६ पर्यंत वीजजोडणी देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यापूर्वी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धरणांवर खर्च झाला. तथापि, त्यातून ओलिताखालील क्षेत्रात फार मोठी वाढ झाली नाही. म्हणून छोटय़ा छोटय़ा गावात जलयुक्त शिवार अभियान राबवविण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. त्यातून ग्रामीण भागात निश्चितच बदल घडून येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्र आíथक विकास मंडळाचे अध्यक्ष कमांडर दीपक नाईक, उपाध्यक्ष कमांडर अनिल सावे, मीनल मोहाडीकर, उद्योगपती आदी उपस्थित होते.