दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे व प्रकाश मेहेता यांच्यासह भाजपच्या काही आमदारांनी शिवाजी पार्क येथे येऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासाठी पितृतुल्य असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे उचित स्मारक व्हावे यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. बाळासाहेबांसारखे दुसरे व्यक्तिमत्त्व होऊ शकत नाही. आमच्यासाठी ते प्रेरणादायी असून मुंबईतच त्यांचे स्मारक उभारण्यासाठी शासन पुढाकार घेईल असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते तसेच अन्य पक्षांच्या नेत्यांची भूमिका लक्षात घेऊन स्मारकाची निर्मिती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पवारांकडून आदरांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैयक्तिक मित्रत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही या वेळी उपस्थित होत्या. पवार पोहोचले त्या वेळी उद्धव ठाकरे स्मृतिस्थळावर नव्हते. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच सेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते. बाळासाहेबांच्या टीकेचे अनेक प्रहार झेलूनही पवार यांचे बाळासाहेबांशी वैयक्तिक जीवनात अत्यंत सलोख्याचे संबंध होते. बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी आवर्जून उपस्थित राहणाऱ्या पवार यांनी बाळासाहेबांच्या उंचीला साजेसे स्मारक बनविण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारीही दाखवली होती.