मुंबईतील ऐरोली परिसरात महायुतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. राहुल नार्वेकर यांच्या शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाण्यावर उद्धव यांनी कडाडून टीका केली. नार्वेकरांसारख्या एक-दोघांच्या जाण्याने शपथ घेऊन बांधलेला शिवबंधनाचा धागा सैल होत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जे मर्द आहेत त्यांच्या हातावरच शिवबंधन टिकते. जे नामर्द आहेत त्यांना शिवबंधन पेलवत नाही असे सांगत उद्धव यांनी सेनेतील बंडखोरांचा समाचार घेतला.  आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी ठाणे आणि कल्याण मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ठाण्यात मनेसेची राष्ट्रवादीशी छुपी युती असल्याचा आरोपसुद्धा यावेळी उद्धव यांनी केला. तसेच मनसेवर टीका करताना मनसे आधी बाळासाहेबांच्या नावाने मते मागायची आता आता मनसे मोदींच्या नावाने मते मागत असल्याची टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ठाणे आणि कल्याण मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळालाच पाहिजे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्य़कर्त्यांना केले. जातीय दंगलींच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची पाठराखण केली. नरेंद्र मोदींवर टीका करताना इतर पक्ष गोध्रा हत्याकांड, शीख दंगल तसेच मुलायमसिंह यांच्याकडून करण्यात आलेली कारसेवकांच्या कत्तलीसारखे मुद्दे सोयिस्कररित्या बाजूला ठेवले जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.