वैभव, संपन्नता आणि समाधानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. सोने-हिरे, जडजवाहिर, प्लॅटिनम, चांदीसारखी संपन्नतेची प्रतीके घरी आणण्यासाठी ग्राहकही आतुरले आहेत. आजच्या शुभमुहूर्तावर अनेक कुटुंबांचा गृहप्रवेश होईल, तर अनेक घरे नव्या वाहनांच्या आगमनातून आनंदाने बहरून जातील. शेअर बाजाराला आलेली मरगळ या उत्साहावर पाणी फेरणार नाही, असा होरा आहे.
   अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव प्रतितोळा २६ हजार ८४५ रुपये आहे. मागील काही दिवसांत दरात वाढ झाली असली तरी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्तावर सोने खरेदीच्या परंपरेवर फारसा परिणाम होणार नसल्याचा मुंबईतील प्रमुख पेढय़ांचा विश्वास आहे.
मध्यमवर्गीयांसाठी सणासुदीच्या निमित्ताने भरविल्या जाणाऱ्या ग्राहकपेठा ही पर्वणी असते. मुंबईत उपनगरांमध्ये अनेक ग्राहकपेठांमधून गृहोपयोगी वस्तूंची खरेदी मोठय़ा प्रमाणावर केली जाते. कपडे, ड्रेस मटेरियल्स, सौंदर्यसाधने, इमिटेशन ज्वेलरीपासून चटण्या-लोणची मसाल्यापर्यंत सारे काही एकाच ठिकाणी मिळणारी ही ठिकाणे गर्दीने फुलून जातील, आणि घराघरांत अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधला जाईल.
* सोनेखरेदीचा आशावाद उंचावला,
* गोल्ड ईटीएफसाठी अधिक कालावधी
* बाजारात आपटी प्रभाव : अर्थसत्ता

सोन्याची उसळी
गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव ३० हजारांच्या घरात होता. मात्र, यंदा हा भाव २६ हजार ८४५ रुपयांवर स्थिरावला आहे.  काही बडय़ा ज्वेलर्सनी दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्क्य़ांपर्यंत सूट जाहीर केली आहे.

म्हाडाच्या घरांची सोडत
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हाडातर्फे आज ९९७ घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. दुपारपासून या सोडतीची ऑनलाइन नोंदणी सुरू होणार असल्याने घराचे स्वप्न पाहणाऱ्यांची झुंबड उडणार आहे.

वाहनखरेदीचा उत्साह
मारुतीच्या काही वितरकांनी सीएनजी कारसाठी एक्स्चेंज ऑफर्स जाहीर केल्या असून आज नोंदणी करणाऱ्यांना एक ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत देण्याचे जाहीर केले आहे. दुचाकींची मोठय़ा प्रमाणावर नोंदणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.