स्वस्तातील स्मार्टफोनसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर गर्दी; यंत्रणा कोसळली; घोटाळा असल्याचा आरोप
अवघ्या २५१ रुपयांमध्ये मिळणाऱ्या स्मार्टफोनची नोंदणी करण्यासाठी गुरुवारी सकाळपासून भारतीयांनी कंपनीच्या संकेतस्थळावर एकच गर्दी केली. परिणामी कंपनीचे संकेतस्थळ क्रॅश झाले. दरम्यान हा फोन म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप प्रस्थापित कंपन्यांकडून होत असून तशा आशयाचे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
रिंगिंग बेल या कंपनीने अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्वस्त स्मार्टफोन बुधवारी भारतीय बाजारपेठेत दाखल केला. या फोनसाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून ती गुरुवारपासून कंपनीच्या freedom 251.com या संकेतस्थळावर खुली झाली. सकाळी अवघ्या काही मिनिटांमध्येच हे संकेतस्थळ क्रॅश झाले. काही वेळाने संकेतस्थळ सुरू झाले मात्र फोनची नोंदणी केल्यावर पैसे भरणा करण्याच्यावेळेस मात्र संकेतस्थळ बंद पडत होते. दुपारनंतर कंपनीने नोंदणी बंद करून ‘एका सेकंदाला सहा लाख हिट्स येत असल्यामुळे सव्‍‌र्हर क्रॅश झाला आहे. पुढील २४ तासांमध्ये तो सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ असा संदेश दाखविला जाऊ लागला.
टीकेचा सूर
रिंगिंग बेल या कंपनीने बाजारात आणलेल्या फोनबाबत अनेक टीका करण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये अ‍ॅपलच्या फोनमधील अनेक आयकॉनची चोरी करण्यात आल्याची टीका होता आहे. मात्र या आयकॉनसाठी अ‍ॅपलने स्वामित्व हक्क मिळवले नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.
मात्र अ‍ॅपल कंपनीच्या संकेतस्थळावरील बौद्धिक संपदा पानावर अ‍ॅपलचा लोगो अथवा कंपनीच्या अ‍ॅप्सचे लोगो वापरण्यास मनाई असल्याचा उल्लेख केला आहे. याचबरोबर कंपनीने फोनची रचना आणि इतर बाबींमध्येही चोरी केल्याचा आरोप होत होता, मात्र हाही दावा खोडून काढत आमचा फोन एखाद्या जुन्या फोनसारखा दिसत असेल तर याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्या फोनची नक्कल केली आहे, असे स्पष्ट केले.

Untitled-17