mum02मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘साहित्य’ हा दिवाळी अंक अग्रेसर लेखकांचा गोतावळा घेऊन दर वर्षी देखण्या अंकांची परंपरा पूर्ण करीत आहे. आगामी वर्ष मराठीतील थोर कथाकार दि. बा. मोकाशी यांच्या शताब्दीचे आहे. त्यांच्या साहित्यिक बाजूवर येत्या वर्षांतला पहिला लेख याच अंकात वाचायला मिळेल. याशिवाय जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने संगीतकार अनिल विश्वास, साहित्यिक श्री. ज. जोशी, माधव सातवळेकर यांच्या कार्याचा गौरव अंकात आहे. शंकर वैद्य आणि सरोजनी वैद्य यांना श्रद्धांजली व्यक्त करणारे दोन भावस्पर्शी लेख वाचनीय आहेत. के. ज. पुरोहित, नीलिमा भावे, गुरुनाथ तेंडुलकर आदींच्या कथा. विजय पाडळकर, स्मिता जोगळेकर यांचे शब्दमंथन, अशोक बेंडखेळे, सुधीर सुखटणकर, अनुपमा उजगरे यांचे ललितबंध आदीमुळे साराच अंक उत्तम आणि  नेटक्या साहित्याने संपन्न झाला आहे.
साहित्य, संपादक, अशोक बेंडखेळे, पृष्ठे : १६८, किंमत १०० रुपये.

मान्यवरांचा शब्दनजराणा
mum03गेली दोन दशके वाचकांना भारत सासणेंच्या खणखणीत दीर्घकथेची सवय लावणाऱ्या दीपावलीमध्ये त्यांची एका अनुवादित लेखापुरती उपस्थिती, ही या अंकाची चकित करणारी बाब असली, तरी अंकातील साहित्याने आपल्या दर्जाची परंपरा कायम राखली आहे. ‘स्त्रियांच्या नजरेतून पुरुष’ या लेखमालेमध्ये डॉ. रश्मी करंदीकर, मंगला आठलेकर, नीना कुलकर्णी, अचला जोशी आणि नीरजा या मान्यवरांनी विचारप्रवर्तक लेखांची माळ गुंफली आहे. ‘द डेली’ या दैनिकाच्या आठवणींचा कोलाज खुमासदार शैलीमध्ये अंबरीश मिश्र यांनी रंगवला आहे. सुबोध जावडेकर, मिलिंद बोकील, नीरजा, मुकुंद टाकसाळे यांच्या कथांसोबत गणेश मतकरी यांची ‘इन्स्टॉलेशन’ ही मराठी गूढकथेच्या प्रवाहातील पुढील पिढीचा आविष्कार म्हणून विशेष उल्लेखावी अशी कथा आहे. अनिल अवचट, विजय पाडळकर, नंदिनी आत्मसिद्ध, हेमंत देसाई आदी नेहमीच्या शिलेदारांच्या लेखांची मेजवानी आणि वसंत आबाजी डहाके, मंगेश विश्वासराव, दासू वैद्य, सतीश काळसेकर आदी मान्यवर कवींचा शब्दनजराणा अंकात आहे.
दीपावली, संपादक : केशवराव कोठावळे, पृष्ठे : २०४ , किंमत : १२० रुपये.

वाचनवेडय़ांचा समाधानमित्र
mum04 वाचन व्यवहाराचे जतन आणि संवर्धन प्रक्रियेत हातभार लावत वाचकांना चोखंदळ बनविणाऱ्या ‘ललित’च्या मुखपृष्ठापासून अंकातील लेखनाची उत्सुकता वाचनप्रेमींमध्ये असते. जयप्रकाश सावंत यांच्या ‘कुजकट समीक्षे’चं संकलन आणि संजय भास्कर जोशी यांच्या ‘सेल्फ हेल्प पुस्तकांची अद्भुत दुनिया’ या दोन अभ्यासपूर्ण लेखांची मौज वाचकांना लुटता येणार आहे. आठवणींची सुरेख शब्दचित्रे उभारणाऱ्या श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी आपल्या लेखनाच्या पूर्वप्रेरणांच्या आठवणी जागविल्या आहेत.  भाषावैज्ञानिक अशोक केळकर आणि ज्येष्ठ प्रा. कवी शंकर वैद्य यांच्या आठवणींना उजळा देणारे लेख अंकात वाचायला मिळतात. ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाविषयी वाचनआठवणींतून उभारलेला वसंत आबाजी डहाके यांचा लेख आणि चेकॉव्हच्या नोंदवहीचा विजय पाडळकर यांनी घेतलेला शब्दशोध अविस्मरणीय ठरावा. ललित, संपादक
केशवराव कोठावळे, पृष्ठे : २०२, किंमत १०० रुपये.

रहस्यरंजनाचा साठा
mum05अर्धशतकाहून अधिक काळ वाचकांची विविध कथांमधून उत्कंठा ताणणाऱ्या धनंजयने यंदाच्या कथांमधील आकर्षण कायम ठेवले आहे. प्रा. अरूण हेबळेकर, डॉ. बाळ फोंडके, सुनील सुळे, मेघश्री दळवी, शरद पुराणिक, डॉ. द. व्यं. जहागिरदार यांच्यासारख्या प्रथितयश लेखकांनी  कथा जबाबदारी पेलली आहे. द लिव्हिंग विल या कथेतील दोन माणसांची परस्परांविषयीची वेगळ्या पद्धतीने असलेली ओढ ही कशी असू शकते हे कथेच्या अखेरपर्यंत वाचकांना खिळवून ठेवते. कर्नल पोंडसे यांनी भारतीय लष्कराच्या एका युद्धाची कथा अवर्णनीय पद्धतीने वाचकांपुढे मांडली आहे. चीनी लष्कराच्या महाकाय सैन्यापुढे अवघ्या काही सैनिकांनी दिलेली झुंज डोळे ओलावल्याखेरीज राहत नाही. 
धनंजय : संपादिका : निलिमा राजेंद्र कुलकर्णी; पृष्ठे : ३९२; मूल्य : २०० रुपये

भरगच्च मनोरंजन
mum06खिडकी हास्यचित्रांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘आवाज’ दिवाळी अंकाचे हे ६४वे वर्ष. पूर्वीच्या तुलनेत या हास्यचित्रांची संख्या आता कमी झाली आहे, त्यात काही बदलही करण्यात आले आहेत, मात्र त्यातील चावटपणा, खट्याळपणा आजही तसाच आहे. या ‘भरगच्च’ हास्यचित्रांव्यतिरिक्त भरगच्च विनोदी मजकूर हे वैशिष्ट्य यंदाही जपले गेले आहे, हे विशेष. प्रसिद्ध लेखक अशोक पाटोळे यांची ‘तो मी नव्हेच’ ही कथा खुसखुशीत आहे, तर मंगला गोडबोले यांची ‘फुल्टू भाषातमाशा’ ही विनोदी कथाही त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उलगडली आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या ‘अच्छे दिन आएंगे’ या आश्वासनाची ’बल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा’ या कथेत अवधूत परळकर यांनी रेवडी उडवली आहे. मात्र, काळाच्या ओघात या आश्वासनांचा फज्जा उडेल आणि देश उलट्या दिशेने वाटचाल करेल हे या फँटसीतून सांगताना त्यांनी बरेच लेखनस्वातंत्र्य घेतले आहे. याशिवाय दत्ता केशव, मुकेश माचकर, प्रभाकर भोगले, गजू तायडे आदींचे लेखनही वाचनीय आहे. हास्यचित्र मालिका आणि कथाचित्रे असे स्वतंत्र विभाग यात आहेत. मंगेश तेंडुलकर, श्रीनिवास प्रभूदेसाई, खलील खान यांची हास्यचित्रे नेहमीप्रमाणे उत्तम आहेत. आवाज, संपादक- भारतभूषण पाटकर, पृष्ठे- २५२, मूल्य- १६०