विद्यापीठाच्याकुलगुरूपदासाठीच्या पात्र उमेदवारांमध्ये डॉ. राजन वेळूकर यांच्या नावाचा समावेश करताना संशोधन समितीने सारासार विचार केला नव्हता, असा निष्कर्ष नोंदवणारा निकाल उच्च न्यायालयाने दिला, परंतु या निकालात न्यायालयाने आपल्या वकिलांनी केलेला महत्त्वाचा युक्तिवाद नमूदच केलेला नाही, असा दावा डॉ.  वेळूकर यांनी केला आहे.
निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यापूर्वी हा निकाल देणाऱ्या खंडपीठाकडून निकालांमधील काही बाबींबाबत आपल्याला स्पष्टीकरण हवे असल्याचा दावा डॉ.  वेळूकर यांनी शनिवारी केला होता. त्यावर निकाल देणाऱ्या खंडपीठासमोर स्पष्टीकरणाबाबतचा अर्ज करण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने डॉ.  वेळूकर यांना दिले होते. त्यानुसार डॉ.  वेळूकर यांच्यातर्फे बुधवारी न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज करण्यात आला. न्यायालयाने डॉ.  वेळूकर यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यावरील सुनावणी ६ जानेवारी रोजी ठेवली आहे.
पात्रता यादीत नावाचा समावेश करण्याविषयी आणि संशोधन समितीच्या अध्यक्षांनी प्रबंधांबाबत केलेल्या प्रतिज्ञापत्रातील काही मुद्दय़ाविषयी आपल्या वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला होता, मात्र निकालात तो नमूद करण्यात आलेला नाही, असे डॉ.  वेळूकरांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा युक्तिवाद निकालात समाविष्ट करून घ्या, अन्यथा तो का केला नाही याची कारणमीमांसा करण्याचे डॉ.  वेळूकर यांनी अर्जात म्हटले आहे.