एल्फिन्स्टन रोड आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेची सिग्नल केबल अज्ञात व्यक्तीने चोरल्यामुळे शुक्रवारी रात्री पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
रात्री आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा उठवत सिग्नल केबल कापली. केबल तुटल्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडली आणि चारही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
तब्बल अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरू झाली. या चोरीप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. रात्री उशीरापर्यंत वाहतूक २० ते २५ मिनिटे विलंबाने सुरू होती. परंतु रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही सूचना प्रवाशांना दिल्या जात नव्हत्या.
गाडय़ांच्या गोंधळामुळे चर्चगेटकडे येणाऱ्या गाडय़ा रखडल्या. याच गाडय़ांमधून काही गार्ड कामावर येणार होते. त्यामुळे चर्चगेट स्थानकावर रात्री ११ ते ११.३० या कालावधीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली. चर्चगेट स्थानकातील फलाट क्र. ३ वर गाडीला सिग्नल मिळूनसुद्धा गाडी तब्बल २५ मिनिटे फलाटावरून सुटली नाही. कारण त्या गाडीचा गार्ड स्थानकात पोहोचू शकला नव्हता.
चर्चगेट स्थानकावरील चारही गाडय़ांचे गार्ड स्थानकात पोहोचू शकले नव्हते असे समजते. परिणामी सिग्न्नल मिळूनही गाडय़ा बाहेर पडू शकत नव्हत्या व फलाट रिकामा नसल्याने स्थानकाकडे येणा-या गाडय़ांची रांग थेट मुबई सेंट्रलपर्यंत लागली होती.