मीरारोड ते दहिसर यादरम्यान गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दुपारी ११.५० ते १२.४० या वेळेत विरारहून चर्चगेटकडे जाण्यासाठी एकही गाडी रवाना झाली नाही, तर सहा गाडय़ा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नालासोपारा, भाईंदर, मीरारोड, वसई या स्थानकांवर प्रवाशांची झुंबड उडाली होती. गाडय़ा का नाहीत, याबाबत रेल्वेतर्फे काहीच उद्घोषणा करण्यात न आल्याने प्रवासी संतापले होते. लोकल विलंबाने धावत असल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. दुपारी एकनंतर रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र या घटनेचा परिणाम संध्याकाळी उशिरापर्यंत वाहतुकीवर झाला होता.