‘रेल्वे मोटरमन आणि गार्ड हे सरकारी कर्मचारी असून तीदेखील माणसेच आहेत. त्यांच्यावर हात उचलणे कायद्याने गुन्हा आहे,’ असा इशारा रेल्वे प्रशासन प्रवाशांना वारंवार देत असताना पश्चिम रेल्वेच्या एका अभियंत्यानेच गार्डला मारहाण करण्याचे प्रकरण दोनच दिवसांपूर्वी दादर स्थानकात घडले. या घटनेनंतर संबंधित अभियंत्याविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या अभियंत्याला अटक झाली, तरी नंतर पाच हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटकाही झाली. आता या प्रकरणाची चौकशी चालू असून तोपर्यंत या अभियंत्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गार्ड आणि अभियंता हे दोघेही पश्चिम रेल्वेतील दोन वेगवेगळ्या कामगार संघटनांत सक्रीय असल्याने या वादाला कामगार संघटनांतील अंतर्गत संघर्षांचीही फोडणी मिळाली आहे.
पश्चिम रेल्वेमध्ये बांधकाम विभागात अभियंता म्हणून काम करणारे चंद्रशेखर किशोर शुक्रवारी अंधेरीला विरार-दादर लोकलच्या गार्डच्या डब्यात चढले. या गाडीवर गार्ड म्हणून उमेश सिंह कार्यरत होते. या गार्डच्या केबिनमध्ये बॅग ठेवण्यावरून किशोर आणि उमेश सिंह यांच्यात बाचाबाची झाली. मात्र केबिनमध्ये असलेल्या इतरांनी या दोघांनाही शांत केले. मात्र दादरला उतरताना उमेश सिंह यांनी किशोर यांना उद्देशून, ‘काही लोकांना धन्यवाद म्हणायलाही खूप कष्ट पडतात’, असे उद्गार काढले. त्यावर भडकलेल्या किशोर यांनी सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीनंतर उमेश सिंह यांनी मुंबई सेंट्रल येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात किशोर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. सिंह आणि किशोर हे दोघेही पश्चिम रेल्वेतील प्रतिस्पर्धी कामगार संघटनांमधील सक्रीय सदस्य आहेत. या कामगार संघटनांमधील वादाचीच पाश्र्वभूमी या घटनेला आहे का, याबाबतही आता चर्चा सुरू आहे.
केबिनमध्ये कर्मचारी?
मोटरमन आणि गार्ड यांच्या केबिनमध्ये इतर कोणत्याही प्रवाशाला शिरकाव करण्यास मज्जाव असतो. मात्र या केबिन्समधून बहुतांश वेळा रेल्वे कर्मचारी सर्रास प्रवास करतात. प्रथम वर्गाचा मोफत पास असलेल्या या कर्मचाऱ्यांवर  केबिनमधून प्रवास केल्याबद्दल कारवाई होत नाही.