वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ पश्चिम रेल्वेच्या मोटरमेननी शुक्रवारी सायंकाळी अचानक चर्चगेट रेल्वे स्थानकात धरणे आंदोलन केले. वेस्टर्न रेल्वे मोटरमन्स असोसिएशनतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आले.
पश्चिम रेल्वेच्या मोटरमनकडून लाल सिग्नल ओलांडून तसेच फलाट सोडून गाडी पुढे नेण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणी संबंधित मोटरमनवर कठोर कारवाई केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी मोटरमननी हे आंदोलन केले. आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. मोटरमनच्या समस्या आपण शासनाकडे मांडू, असे आश्वासन अ‍ॅड. शेलार यांनी मोटरमनना दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. मोटरमनच्या आंदोलनामुळे चर्चगेट रेल्वेस्थानकातून काही काळ एकही गाडी न सुटल्याने चारही फलाटांवर गाडय़ा थांबून राहिल्या. त्याचा परिणाम चर्चगेटच्या दिशेकडे येणाऱ्या वाहतुकीवर झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.