लोकलचे डबे घसरण्याला २४ तास उलटल्यानंतरही पश्चिम रेल्वेची चर्चगेटकडे जाणारी जलद मार्गावरील सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. बोरीवली ते चर्चगेट हे अंतर कापण्यासाठी अजूनही दोन ते तीन तास लागत असल्याचे अनेक प्रवाशांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. जलद मार्गावरील लोकल अंधेरी ते विलेपार्ले या ठिकाणी धीम्या मार्गावर वळविण्यात येत आहेत. त्यामुळे तिथेच गाडी पुढे सरकण्याला खूप वेळ लागत असल्याची माहिती मिळते आहे. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी सर्वकाही सुरळीत झाल्याचे निवेदन प्रसिद्ध केले असले, तरी वास्तवात अजून बऱयाच अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागते आहे. एकीकडे रेल्वेसेवा सुरळीत नाही, तर दुसरीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत.
पश्चिम रेल्वेवरील ओव्हरहेड दुरूस्तीचं काम पूर्ण झाले असून, अपघातग्रस्त रेल्वेचा डबा रेल्वे मार्गावरून हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. तरीही रेल्वे वाहतूक अजून पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. कांदिवली ते विलेपार्ले हे अंतर कापण्यासाठी साधारणपणे तासाभराचा वेळ लागतो आहे. जनसंपर्क अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार रेल्वेसेवा बुधवारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांनी सुरळीत झाली आहे. रेल्वेगाड्यांबद्दल पश्चिम रेल्वे फेसबुक आणि ट्विटरवर अपडेट्स देत असताना प्रत्यक्ष स्थानकावर असलेल्या प्रवाशांना उदघोषणेद्वारे कोणतीच माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात आणखी भर पडते आहे.
पश्चिम रेल्वे साधारण तासभर उशीराने धावत असून, विरार ते अंधेरी दरम्यानच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी आहे.

(छाया- संतोष परब)