वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाची २८० दलालांवर कारवाई

लांब पल्ल्याच्या गाडय़ांची तिकिटे योग्य प्रवाशांच्या हाती मिळावीत आणि त्यात कोणताही घोटाळा होऊ नये म्हणून आयआरसीटीसीने अनेक प्रयत्न करूनही ई-तिकिटांमधील दलाली अद्याप थांबलेली नाही. मात्र रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईमुळे २०१४-१५च्या तुलनेत २०१५-१६ या वर्षांत पाच पट अधिक प्रकरणे पकडण्यात यश आले. या एका वर्षांत २८० तिकीट दलालांवर कारवाई करत १.१० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे.

रेल्वे सुरक्षा दलाने तिकिटांतील घोटाळा दूर करण्यासाठी गेल्या वर्षी विशेष मोहीम हाती घेतली होती. पश्चिम रेल्वेवरील अनेक स्थानकांवर तिकीट दलालांचे अस्तित्व असल्याच्या तक्रारी वारंवार रेल्वे सुरक्षा दल तसेच रेल्वेकडे येत होत्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्यातही अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून रेल्वे सुरक्षा दलाने ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेनुसार रेल्वे तिकिटे आरक्षित करून देणाऱ्या अनधिकृत ठिकाणांवर छापे टाकण्यापासून अंधेरी, मुंबई सेंट्रल, बोरिवली येथील प्रवासी आरक्षण केंद्रांजवळील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून कारवाई करण्यापर्यंत अनेक गोष्टी करण्यात आल्या.

२०१४-१५ या वर्षांत रेल्वे सुरक्षा दलाकडे ई-तिकिटातील दलालीच्या फक्त ४७ घटना नोंदवल्या गेल्या होत्या. मात्र २०१५-१६ या वर्षांत त्यात १८१ घटनांची भर पडली आणि एकूण २२८ घटनांचा छडा लावण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले. या २२८ घटनांमधून २८० दलालांना अटक करून त्यांच्यावर कारवाईही झाली. २०१४-१५मध्ये ही संख्या फक्त ५८ एवढी होती. तसेच २०१४-१५ या वर्षांत या ५८ दलालांकडून २५.६६ लाख रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली होती. २०१५-१६मध्ये या तिकिटांच्या मूल्यात तब्बल चौपट वाढ झाली आहे.

रेल्वेचे आवाहन..

तिकीट दलालांवर अंकुश घालण्यासाठी आम्ही मोहीम अधिक तीव्र करणार आहोत. तिकीट दलालांमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण जाते. तसेच प्रवाशांना वाजवीपेक्षा जास्त शुल्क देऊन तिकीट घ्यावे लागते. त्यामुळे ही मोहीम तीव्र करण्यासाठी दलालविरोधी पथके, सीसीटीव्ही कॅमेरे आदींवर भिस्त ठेवण्यात येणार आहे. मात्र प्रवाशांनीही दलालांकडून तिकिटे विकत घेण्याऐवजी रीतसर कायदेशीररीत्या तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले.