लोकलमध्ये चढल्यानंतर सामाजिक भान जपण्याच्या सूचनांपासून जाहिरांतींपर्यंत विविध गोष्टी स्पीकरच्या माध्यमातून आपल्या कानावर पडत असतात. गाडी ज्या स्थानकातून सुटते त्या स्थानकात हा आवाज खूप मोठा जाणवतो. यामुळे तो कमी करण्याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत पश्चिम रेल्वेने आवाजाची पातळी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दरदिवशी १३०५ फेऱ्या चालवल्या जातात. यातून रोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र प्रवासी भाडय़ातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण कमी असल्याचे रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनेक उपाययोजना शोधून काढल्या आहेत. यात पश्चिम रेल्वेने लोकलच्या डब्यात ध्वनी जाहिराती सुरू केल्या आहेत. दीड वर्षांत पाच कोटींचे उत्पन्न देणाऱ्या या जाहिरातींचा कालावधी एक मिनिटांचा असतो. यात २० सेकंद जाहिरात, २० सेकंद प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संदेश आणि २० सेकंद संगीताची धून प्रवाशांना ऐकवली जाते.
मात्र एका मिनिटाच्या या जाहिरातींच्या आवाजामुळे प्रवाशांना कानात बोटे टाकण्याची वेळ येत ओढावत असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे करण्यात आल्या आहेत. सकाळी सुरू होणाऱ्या या जाहिराती शेवटच्या लोकलमध्येही प्रवाशांच्या कानावर आदळत असतात. या जाहिरातींचा त्रास प्रवाशांना होत असल्याने या जाहिरातींचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे. याशिवाय सकाळच्या व सायंकाळच्या वेळेत या जाहिरातींची आवाजाची पातळी प्रवाशांना त्रास होऊ नये, या पातळीत ठेवली जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरतचंद्रायन यांनी सांगितले.