पर्यावरण संवर्धन आणि वेळेची बचत या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रेल्वे मंत्रालयाने बुधवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकीट प्रणालीची सुविधा सुरू केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन केवळ एवढय़ावर समाधान न मानता मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रमासिक पासधारकांना दिलासा देणार आहे. पास काढण्यासाठी दर महिन्यात किंवा तीन महिन्यांतून एकदा तिकीट खिडकीवर रांगा लावणाऱ्या पासधारकांना आता मोबाइल तिकीट प्रणालीद्वारे पास काढता येणार आहे. तसेच या पासची छापील प्रत बाळगण्याची गरज नसून प्रवाशांच्या मोबाइलमध्येच हा पास उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय भागासाठी पेपरलेस मोबाइल तिकीट प्रणालीचे उद्घाटन बुधवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या रेल भवन येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. या वेळी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद आदी उपस्थित होते. आता मोबाइल तिकीट प्रणालीवरून काढलेल्या तिकिटांची छापील प्रत घेण्याची सक्ती प्रवाशांवर नसेल. मात्र ही प्रणाली केवळ पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांच्या प्रवासापुरतीच उपयोगी ठरणार आहे.
दरम्यान, मोबाइलवरून तिकीट काढण्याची सुविधा प्रवाशांना दिल्यानंतर आता पेपरलेस मासिक पास काढण्याची सुविधाही याच अ‍ॅपद्वारे देण्यात येणार असल्याची माहिती सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम (क्रिस) या संस्थेचे मुंबईचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. पहिल्यांदाच पास काढणाऱ्यांना या अ‍ॅपद्वारे पास काढणे शक्य होणार नसून फक्त पासचे नूतनीकरण करता येणार आहे. मोबाइलवरून पास काढण्यासाठी प्रवाशांना कोणत्या गोष्टींची माहिती अ‍ॅपमध्ये द्यावी लागेल, याबाबत सध्या चाचपणी होत आहे. त्यात रेल्वेच्या ओळखपत्र क्रमांकाबरोबरच प्रवाशांच्या मोबाइल क्रमांकाचाही समावेश असेल, असेही बोभाटे यांनी स्पष्ट केले.

अशी असेल प्रणाली
* मासिक वा त्रमासिक पास काढल्यानंतर त्याची एक प्रत प्रवाशांच्या मोबाइलवर पाठवली जाईल
* ही प्रत प्रवाशांना अ‍ॅपद्वारे मोबाइलमध्ये पास संपेपर्यंत जतन करावी लागेल
* तिकीट तपासनीसाने मागणी केल्यावर ती दाखवावी लागेल
* दोन महिन्यांत पश्चिम रेल्वेवर प्रणाली कार्यान्वित होईल