पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांसाठी सुविधा;  मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मात्र रांगेची वाट

उपनगरीय प्रवासासाठी तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याऐवजी मोबाइलवरच तिकीट काढण्याची सुविधा प्रवाशांना दिल्यानंतर आता सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमने (क्रिस) प्लॅटफॉर्म तिकीटही मोबाइलवरच काढण्याची यंत्रणा सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे याआधी पश्चिम व मध्य रेल्वेवरील मोजक्या स्थानकांचे प्लॅटफॉर्म तिकीट काढणे शक्य होत होते. मात्र आता पश्चिम रेल्वेवरील सर्वच स्थानकांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. पण मध्य रेल्वेने याबाबतचा अहवाल ‘क्रिस’ला सादर न केल्याने मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मात्र प्लॅटफॉर्म तिकीटसाठी रांगेतच उभे राहावे लागणार आहे.

क्रिसने कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणाली सुरू करताना पश्चिम व मध्य रेल्वेवरील काही महत्त्वाच्या स्थानकांची प्लॅटफॉर्म तिकिटे काढण्याची सुविधाही या प्रणालीवर उपलब्ध करून दिली होती. त्यात पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली या स्थानकांचा आणि मध्य रेल्वेवरील सीएसटी, एलटीटी, दादर, ठाणे, घाटकोपर या स्थानकांचा समावेश होता. प्लॅटफॉर्म तिकिटे काढण्यासाठी मोबाइल तिकीट प्रणालीचा वापर किती होतो, त्यात काय बदल हवेत, याबाबतचा अहवाल क्रिसने दोन्ही रेल्वे प्रशासनांकडे मागितला होता.

पश्चिम रेल्वेने हा अहवाल सादर केला असून त्यानुसार आता पश्चिम रेल्वेच्या सर्व उपनगरीय स्थानकांचे प्लॅटफॉर्म तिकीट मोबाइलवरच काढता येणार आहे. मध्य रेल्वेने मात्र हा अहवाल अद्याप सादर केलेला नाही. याबाबत मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता मोबाइल तिकीट प्रणालीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अहवालात काय लिहायचे हा प्रश्न असल्याचेही त्याने स्पष्ट केले. मात्र त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी अजूनही रांगेतच उभे राहावे लागणार आहे.