पश्चिम रेल्वेला व्हॉट्सअ‍ॅपची मदत

उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, टॉकबॅकप्रणाली असे विविध प्रयोग करणाऱ्या पश्चिम रेल्वेवर आता महिला सुरक्षेसाठी व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमाचीही मदत घेतली जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने महिला प्रवाशांसाठी ‘आरपीएफ सखी’ नावाचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. हे ग्रुप दोन स्थानकांच्या टप्प्यांनुसार असून असे एकूण आठ ग्रुप आहेत. या आठ ग्रुपमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला अधिकाऱ्यांसाही समावेश असल्याने महिला प्रवाशांनी त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्या या ग्रुपवर टाकल्यास त्यावर त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते दादर या स्थानकांदरम्यान काही वर्षांपूर्वी महिला प्रवाशांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. त्याशिवाय काही वर्षांपूर्वी बोरिवली स्थानकातून निघालेल्या एका गाडीत एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटनाही घडली होती. या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर भर दिला होता. आता त्या पुढे जात थेट महिला प्रवाशांच्या सुरक्षाविषयक समस्या जाणून घेण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ तयार करण्यात आले आहेत. चर्चगेट-दादर यांदरम्यान एक, दादर-वांद्रे यांदरम्यान एक, वांद्रे ते बोरिवली यांदरम्यान तीन आणि दहिसर ते विरार यांदरम्यान तीन असे एकूण आठ ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपचे नाव ‘आरपीएफ सखी’ असे ठेवले असून आरपीएफच्या काही महिला अधिकारी सर्व ग्रुपमध्ये सहभागी असतील. महिला प्रवाशांनीही अधिकाधिक संख्येने या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अनुपकुमार शुक्ला यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागासाठी..

हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप महिलांसाठीच असून त्यांनी या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून १८२ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा ९००४४९९७१८ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून विनंती करायची आहे. त्यानंतर या महिलांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सदस्य बनवले जाईल.