चार हजार विद्यार्थ्यांना आठवडय़ातून तीनदा सुभाषितांचे संदेश; विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयाचा उपक्रम
केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून संस्कृत भाषेला अभ्यासक्रमात दिले जाणारे महत्त्व एकीकडे चर्चेचा मुद्दा ठरत असतानाच विद्याविहार येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची गोडी निर्माण करण्यासाठी आता थेट व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला आहे. या महाविद्यालयाच्या ‘भारतीय संस्कृत पीठम’तर्फे चार हजार विद्यार्थ्यांना आठवडय़ातून तीनदा संस्कृत सुभाषिते ‘व्हॉट्सअ‍ॅप संदेश’ म्हणून पाठवली जात आहेत.
‘सुभाषित’ हा प्रकार संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण अंग आहे. संस्कृतमधील विविध विषयांचा ज्ञानठेवा सुभाषितांमध्ये सामावलेला आहे. जीवनातील शाश्वत सत्याचा उद्घोष करणाऱ्या सुभाषितांमधून जीवन जगताना उपयोगी पडेल असे ज्ञान व शहाणपण लालित्यपूर्णतेने मांडलेले असते, तेही अगदी मूठभर शब्दांमध्ये! सुभाषितांच्या या ज्ञानभांडारापासून सध्याची पिढी अनभिज्ञ राहू नये यासाठी ‘भारतीय संस्कृत पीठम’ या संस्कृत भाषेच्या अध्ययन व प्रसारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेने पुढाकार घेतला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत सुभाषितांचा हा समृद्ध ठेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेने काही दिवसांपूर्वीच एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ई-मेलसारख्या आधुनिक संवाद माध्यमांतून भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये सुभाषितांच्या रूपात असलेल्या ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जात आहे. यासाठी लिखित तसेच श्राव्य स्वरूपात ही सुभाषिते संस्थेने तयार केली आहेत. महाविद्यालयातील तसेच इतरही सुमारे चार हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आठवडय़ातून तीनदा विविध विषयांवरील ही सुभाषिते ते वापरत असलेल्या समाजमाध्यमांवर पाठविली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आरोग्य, आहार, व्यायाम, मन, पर्यावरण, नेतृत्वगुण, आर्थिक व्यवहार, एकता आदी अनेक विषयांवरील संस्कृत सुभाषिते मराठी, हिंदी व इंग्रजी अनुवादासह वाचायला व ऐकायला मिळत आहेत.
‘‘ऋग्वेदापासून ते चरक, पतंजली, सुश्रुत आदी अनेकांनी लिहिलेल्या ग्रथांमधून आजच्या काळात जीवन जगताना उपयोगी पडतील अशी निवडक सुभाषिते विद्यार्थ्यांना पाठविली जातात,’’ असे भारतीय संस्कृत पीठमचे संचालक कला आचार्य यांनी सांगितले. आजच्या तरुणाईला आपल्या प्राचीन ज्ञानाबद्दल कुतूहल आहे; परंतु ते वाचण्यासाठी त्यांना व्यग्र जीवनामुळे संधीच मिळत नाही. त्यामुळे सध्याच्या पिढीला समाजमाध्यमांतूनच सुभाषितांची ओळख करून दिली जात आहे, असे आचार्य यांनी सांगितले. तसेच या सुभाषितांचे पुस्तकही प्रकाशित केले जाणार आहे.
प्रसाद हावळे