प्रशासकीय बेफिकिरीचा सर्वसामान्य लोकांना बसणारा फटका नवा नसला तरी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा फटका बुधवारी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसला. त्यामुळे विधान परिषदेत आपल्याच खात्याचा प्रश्न ऐन वेळी राखून ठेवण्याची सभापतींना विनंती करण्याची आफत मुख्यमंत्र्यांवर ओढवली.
 विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना सभापतींनी प्रश्नोतराच्या यादीतील ६व्या क्रमांकाचा (प्रश्न क्रमांक ३२९२) प्रश्न पुकारला.
 पुणे शहराच्या प्रस्तावित रिंगरोडचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याबाबत अनंत गाडगीळ व अन्य सदस्यांनी हा प्रश्न विचारला होता. गाडगीळ यांनी प्रश्नही पुकारला मात्र त्याच वेळी मुख्यमंत्री उभे राहिले. सभापती महोदय, या प्रश्नाला आपल्याला दुसऱ्याच उत्तराचे ‘ब्रिफिंग’ करण्यात आले असून या प्रश्नाचे आपल्याकडे उत्तर नाही.
 बुद्धीचातुर्याने आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. मात्र त्यामुळे प्रश्नाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवा, घडल्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करेन, असे सांगत हा प्रश्न राखून ठेवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनीच केली आणि सारे सभागृह अवाक् झाले. मग सभापतींनी हा विषय पुढे वाढू न देता पुढील प्रश्न पुकारत वादावर पडदा टाकला.