शोभा डे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला मुंबई पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शोभा डे यांनी काल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबई पोलिसांची खिल्ली उडविणारे एक छायाचित्र ट्विट केले होते. या छायाचित्राबरोबरचा संदेश संबंधित कर्मचाऱ्यावर शारीरिक टिप्पणी करणारा होता. मात्र, शोभा डे यांच्या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी शोभा डे यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. आम्हालाही विनोद आवडतात. मात्र, याठिकाणी वापरण्यात आलेला संदर्भ पूर्णपणे चुकीचा आहे. छायाचित्रातील कर्मचाऱ्याने घातलेला गणवेश हा मुंबई पोलिसांचा नाही. आम्हाला तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकाकडून अजून चांगल्या अपेक्षा आहेत, असा टोला या ट्विटमधून डे यांना लगावला आहे. त्यानंतर अनेक ट्विटरकरांनीही शोभा डे यांना प्रत्युत्तर दिल्याबद्दल मुंबई पोलिसांचे कौतूक करत त्यांना पाठिंबा दिला. मुंबई पोलीस त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ठामपणे उभे राहिले, याबद्दल त्यांना सलाम, अशा प्रतिक्रियाही काही ट्विटरकरांनी व्यक्त केल्या आहेत. शोभा डे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे छायाचित्र ट्विट केले होते. मात्र, या ट्विटमधील छायाचित्राबरोबरचा संदेश संबंधित कर्मचाऱ्यावर शारीरिक टिप्पणी करणारा होता. शोभा डे यांनी ट्विट केलेल्या छायाचित्रात एक वजनदार पोलीस कर्मचारी दिसत असून शोभा डे यांनी त्याला उद्देशून ‘हेवी पोलीस बंदोबस्त इन मुंबई टुडे’, असा काहीसा खिल्ली उडवणारा संदेश लिहला आहे. मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे वाढलेले वजन आणि फिटनेसवर यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, शोभा डे यांनी ट्विट केल्यानंतर याप्रकरणाला भलतेच वळण लागले. पोलीस कर्मचाऱ्याची शारीरिक खिल्ली उडविल्याने अनेक ट्विटरकरांकडून शोभा डे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने शोभा डे यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. रिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि खाली हातांनी परतायचे, हेच भारतीय खेळाडूंचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य आहे. भारतीय खेळाडू पैसा आणि संधी दोन्हीचा अपव्यय करत आहेत, असे डे यांनी म्हटले होते. त्यानंतर अनेक क्रीडापटू आणि सेलिब्रिटींनी डे यांना खडे बोल सुनावले होते. जेव्हा पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांनी भारतासाठी पदक मिळवले तेव्हा अमिताभ बच्चन, वीरेंद्र सेहवाग आदींनी शोभा डे यांचा समाचार घेतला होता.