सध्याच्या जमान्यात एखादी माहिती शोधण्यासाठी विश्वासार्ह पर्याय म्हणून गुगलकडे पाहिले जाते. मात्र, नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे गुगलचा पर्याय आता कितपत खात्रीलायक राहिला आहे, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण, सध्या गुगलवर तुम्ही ‘हु इज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र’ असे सर्च केल्यास तुम्हाला एक अजब प्रकार पहायला मिळेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची माहिती असली तरी छायाचित्र मात्र शरद पवारांचे आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर “राज्यात सरकार कुणाचंही असो, सरकार चालवतात शरद पवारच” असा मेसेज व्हायरल होताना दिसत आहे.
यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एका आशयामुळे गुगलने मोदींची जाहीर माफी मागितली होती. गुगलच्या जगातील आघाडीच्या दहा गुन्हेगारांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असल्याने त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.

shard450