अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील सारे नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले असले तरी ही चौकशी लुटूपुटीची होणार की काय, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अजितदादांना वाचविण्यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा भर राहणार असला तरी भुजबळ यांच्या पाठीशी पक्ष तेवढाच भक्कमपणे उभा राहणार का, असाही काहीसा शंकेचा सूर व्यक्त केला जात आहे.
अजितदादा, भुजबळ आणि तटकरे या तीन नेत्यांची गैरव्यवहारांच्या आरोपांवरून चौकशी सुरू झाल्याने राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. नेतेमंडळींवर सातत्याने होणाऱ्या आरोपांमुळे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फटका बसला होता. अजित पवार आणि तटकरे यांना सिंचन गैरव्यवहरप्रकरणी तर भुजबळ यांना सार्वजनिक बांधकाम खात्यातील कामांबाबत चौकशीला सामोरे जावे लागले आहे. अजितदादा किंवा भुजबळ या दोन्ही नेत्यांविरुद्ध गंभीर स्वरूपांचे आरोप झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधीच भाजपशी संधान बांधले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीत मधूर संबंध निर्माण झाले आहेत. काँग्रेसबरोबर आघाडीत असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी शरद पवार यांचे चांगले संबंध
होते.
भाजपची सत्ता येताच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर सूर जुळले आहेत. पक्षाचे पहिल्या फळीतील नेते अडचणीत येणे राष्ट्रवादीसाठी कधीही सोयीचे ठरणारे नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधातील चौकशीत केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे असलेले संबंध लक्षात घेता भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांभाळून घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
राष्ट्रवादीत अजित पवार व छगन भुजबळ यांच्यात फारसे कधीच सख्य नव्हते. एव्हाना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी भुजबळांचे अनेकदा मतभेद झाले आहेत. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता भुजबळ यांच्या पाठीशी पक्ष कितपत भरभक्कपणे उभा राहतो हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांना वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्व सारे कसब पणाला लावेल, पण भुजबळांबाबत पक्ष तेवढी अनुकूल भूमिका घेईल का, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.