बॉलिवूड नामक सिनेमाच्या अद्भुत नगरीवर कोणाचं वर्चस्व असणार, प्रस्थापितांचे की नवोदितांचे? २०१२ हे वर्ष इंडस्ट्रीसाठी नवे पर्व ठरले आहे. इथे गुणवंतांची एकच गर्दी झाली आहे. त्यामुळे येत्या वर्षांत आपले अस्तित्त्व कायम राखण्यासाठी प्रस्थापितांचीही कसोटी लागणार आहे. पण, या स्पर्धेत कडवे आव्हान देणारे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ कोण असतील? पुढच्या वर्षीच्या या दमदार मोहऱ्यांवर शनिवारी स्क्रीन पुरस्कारांची मोहोर उमटणार आहे. अनुराग बसूचा ‘बर्फी’, गौरी शिंदेचा ‘इंग्लिश विंग्लिश’, अनुराग कश्यपचा ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, सुजय घोषचा ‘कहानी’, तिग्मांशू धुलियाचा ‘पानसिंग तोमर’ आणि शुजित सिरकारचा ‘विकी डोनर’ हे चित्रपट सवरेत्कृष्ट चित्रपटासाठीचे दावेदार आहेत.
१९ वा वार्षिक कलर्स स्क्रीन पुरस्कार सोहळा शनिवारी वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी रूपेरी पडद्यावरील तारकादळ वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर उतरेल. विविध मनोरंजनाचे कार्यक्रम असलेल्या या सोहळ्याचा उत्कंठावर्धक बिंदू असेल पुरस्कारांच्या घोषणेचा! २०१२ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूपच लाभदायक गेले. आठ सुपरहिट आणि १२ हिट चित्रपटांची नोंद करणाऱ्या या वर्षांने ‘पानसिंग तोमर’, ‘विकी डोनर’, ‘कहानी’, ‘इंग्लिश विंग्लिश’ असे चौकटीबाहेरचे अनेक चित्रपटही पाहिले. या सर्वामधून सवरेत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री कोण आहे, हे शनिवारी ठरेल.
सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी अनुराग बसू (बर्फी), सुजोय घोष (कहानी), अनुराग कश्यप (गँग्ज ऑफ वासेपूर), तिग्मांशु धुलिया (पानसिंग तोमर) आणि शूजित सिरकार (विकी डोनर) यांच्यात स्पर्धा असेल. विशेष म्हणजे या दिग्दर्शकांचेच चित्रपट सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत आहेत. त्याचप्रमाणे सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठी आमिर खान (तलाश), मनोज बाजपेयी (गँग्ज ऑफ वासेपूर), हृतिक रोशन (अग्निपथ), रणबीर कपूर (बर्फी), इरफान खान (पानसिंग तोमर), सलमान खान (दबंग-२) आणि शाहरूख खान (जब तक है जान) हे एकमेकांसमोर असतील.
अभिनेत्रींमध्येही ‘कांटेकी टक्कर’ असेल. विशेष म्हणजे विद्या बालन (कहानी), करीना कपूर (हिरॉइन), प्रियांका चोप्रा (बर्फी) आणि दीपिका पडुकोण (कॉकटेल) या सध्याच्या घडीच्या आघाडीच्या अभिनेत्रींबरोबरच अनेक वर्षांनी कमबॅक करणाऱ्या श्रीदेवी (इंग्लिश विंग्लिश) व पहिल्यांदाच चित्रपटात आलेल्या परिणीती चोप्रा (इशकजादे) या दोघीही या शर्यतीत आहेत. याशिवाय आणखी बरेच पुरस्कार या सोहळ्यात जाहीर होणार आहेत.