‘ठाकरे कुटुंबाने एकत्र येऊन काम करणे हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली असेल,’ असे मनोगत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शिवसेनाप्रमुखांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत व्यक्त केले. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना आणि भाजपचे नेते उपस्थित असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचा एकही नेता उपस्थित नव्हता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या या सभेमध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, गृहमंत्री आर. आर. पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती वसंत डावखरे, मंत्री हर्षवर्धन पाटील, शेकापचे जयंत पाटील, चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ खाडिलकर, बीसीसीआयचे रवी सावंत, लीलावती इस्पितळाचे चेतन मेहता, माजी क्रिकेटपटू माधव मंत्री, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उद्योगपती राहुल बजाज आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या आठवणींनी या सभेला वेगळेच गांभीर्य प्राप्त झाले होते. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू या वक्त्यांच्या भाषणातून उलगडले.
लालकृष्ण अडवाणी म्हणाले की, १९५२ पासून आपण देशातील अनेक नेते पाहत आलो आहोत. पण जे पटेल तेच बोलणारा आणि वागणारा नेता विरळ होता. सत्तेचे कोणतेही पद नसतानाही त्यांचा प्रभाव कायम होता. त्यांची नेतृत्वक्षमता अद्भुत होती. त्यांनी कधीही टीकेची पर्वा केली नाही. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाला त्यांनी दिलेले योगदान मोठे होते, असे त्यांनी सांगितले.
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी म्हणाले की, एखादी व्यक्ती किती जगली यापेक्षा ती कशी जगली हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेब दुरून जसे मोठे नेते वाटत होते तसेच जवळ गेल्यावर त्यांचे मोठेपण आणखी जाणवत असे. मोठय़ा मनाचा, परखड बोलणारा, स्वत:च्या विचाराप्रमाणे नेतृत्व देणारे त्याचे व्यक्तिमत्त्व इतरांना कायम प्रेरणादायी होते. त्यांच्यामुळेच राज्यात उड्डाणपूल, द्रुतगती महामार्ग होऊ शकले. जातीपातीच्या बाहेर जाऊन त्यांनी राजकारण केले आहे, असेही ते म्हणाले.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे म्हणाले की, शिवसेना-भाजप युतीचे रहस्य म्हणजे बाळासाहेब होय. त्यांनी शिवसेनेप्रमाणेच भाजपवरही प्रेम केले. त्यांचा शब्द भाजपसाठीही कायम अखेरचा शब्द होता. हिंदूंचे ते खरे नेते होते. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना सांभाळून घेण्याचे यंदाच्या दसरा मेळाव्यातील त्यांचे भावनिक आवाहन शिवसेनेप्रमाणेच भाजपलाही लागू असून आम्ही ते निश्चितच पाळू असेही ते म्हणाले.
रिपाइंचे नेते रामदास आठवले म्हणाले की, बाळासाहेबांच्या स्वप्नानुसार, विधानसभेवर भगवा आणि निळा झेंडा फडकविण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याची सूचना त्यांचीच होती. ते एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांच्या पाठीशी आम्ही कायम राहू, असेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले की, प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शिवसेनाप्रमुखांना विनंती करण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांच्याकडे गेल्यावर विनंती करण्याची गरजच पडली नाही. कारण त्यांनी स्वत:च त्यांना पाठिंबा जाहीर केला.
शेवटपर्यंत लढण्याची त्यांची वृत्ती ही त्यांच्या शेवटच्या मृत्यूशी झुंज देतानाही दिसून आली. त्यांच्या निधनाने राज्याचे अतोनात नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.