भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी नवघर पोलीस ठाण्यात घुसून पोलीस निरीक्षकाला केलेल्या मारहाणीबाबत उशिरा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस आयुक्त राकेश मारिया संतप्त झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करायला उशीर का केला याचा खुलासा त्यांनी मागविला आहे.
 भाजपचे कार्यकर्ते परीक्षित घुमे यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात मारामारीसंदर्भात गुन्हा दाखल होता. त्याबाबत त्यांना चौकशीसाठी गेल्या गुरुवारी नवघर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. ही माहिती मिळताच खासदार सोमय्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात घुसले. गुन्हे प्रकटीकरण कक्षात जाऊन त्यांनी या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक संपत मुंडे यांना दमदाटी करत मारहाण केली आणि आरोपी घुमे यांना घेऊन गेले. एवढा गंभीर प्रकार घडूनही याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मात्र, मुंडे यांनी या घटनेची पोलीस डायरी करून ठेवली होती. एका स्वयंसेवी संस्थेने याबाबत आवाज उठवल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे रविवारी गुन्हा दाखल झाला. आता सहायक पोलीस आयुक्तामार्फत या प्रकरणाची चौकशी होत आहे.  एवढा प्रकार घडूनही गुन्हा दाखल करायला उशीर का केला, कुणाचा दबाव होता आदींचा खुलासा मारिया यांनी मागवला आहे. या प्रकरणी कारवाई केली जाईल, असेही आश्वासन मारिया यांनी दिले.