मंदीमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना तोटा

आर्थिक मंदी आणि वाढते यांत्रिकीकरण यांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती झाकण्यासाठी कर्मचारी कपातीची कुऱ्हाड चालवली जात आहे. तसेच वाढती स्पर्धा आणि विविध परदेशी धोरणांमुळे कामे मिळण्यावर परिणाम झाल्याने आयटी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू असल्याचा आरोप या क्षेत्रातील कर्मचारी संघटनांकडून होत आहे. तर वर्तमानकाळातील गरजांवर निर्णय घेत काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर ही वेळ कधी तरी येणारच होती, असे तज्ज्ञांचे मत आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

गेल्या दोन महिन्यांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सुरू असलेली कर्मचारी कपात ही आणखी काही काळ सुरू राहणार असून यामध्ये तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही संख्या २००८ मधील जागतिक आर्थिक मंदीच्या काळात झालेल्या नोकरकपातीपेक्षाही जास्त असू शकेल. ही कपात करत असताना बदलत्या तंत्रज्ञानाचे कारण दिले जात आहे. तसेच जे कर्मचारी बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वत:मध्ये कौशल्य विकसित करत नाहीत त्यांनी थेट बाहेरचा रस्ता धरावा, अशी भूमिकाही अनेक कंपन्यांनी घेतली आहे; पण प्रत्यक्षात मुख्यत्वेकरून आऊटसोर्सिगवर चालणारे देशातील आयटी क्षेत्र हे सध्या नफ्याच्या आकडय़ांकडे पाहात आहेत. अनेक विकसनशील देशांनी आऊटसोर्सिग सेवा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यांची सेवा भारताच्या तुलनेत कमी पैशांत मिळू लागली आहे. यामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढू लागली आहे. अनेक कंपन्यांना कमी पैशांमध्ये कामे स्वीकारावी लागत आहेत. याचा परिणाम नफ्यावर होऊ नये यासाठी कंपन्यांनी ही मनुष्यबळात कपात सुरू केल्याचे मत ‘बीपीओ-आयटी एम्प्लॉइज कॉन्फडरेशन’चे अध्यक्ष अजित सावंत यांनी व्यक्त केले आहे. ही कपात करत असताना काही कंपन्यांनी एकदम खालच्या पदावर काम करणारे व उच्चपदस्थ यांना वगळून मधल्या पातळीवर गलेलठ्ठ पगारावर काम करणाऱ्यांना लक्ष्य केले आहे. तसेच ही कपात करत असताना ‘या व्यक्तीत कौशल्यांचा अभाव असल्याने ती काम करत नसल्याचा’ ठपका ठेवला जातो. यामुळे त्यांना दुसरीकडे नोकरीही मिळत नाही. परिणामी या तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत असल्याचेही सावंत यांनी नमूद केले. हा ताण सहन झाला नाही म्हणून गेल्या दोन महिन्यांत एक आत्महत्या झाली असून मुंबईतील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही कपात अशीच सुरू राहिली तर हे प्रमाण वाढणार असल्याची भीतीही सावंत यांनी व्यक्त केली. याशिवाय आवश्यक ते कौशल्य कर्मचाऱ्यांना शिकविणे ही कंपनीचीच जबाबदारी आहे. कंपनीने यासाठी कार्यालयात विशेष व्यवस्था करावी, अन्यथा बाहेर शिकण्यासाठी त्यांना सुट्टी अथवा सवलत द्यावी. अन्यथा नऊ तासांचा कार्यालयीन वेळ चार तास प्रवासाचे खर्च झाल्यानंतर तो कर्मचारी कौशल्य आत्मसात करण्यासाठी कधी वेळ देईल, असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला आहे. सावंत यांनी या संदर्भात कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना पत्र लिहिले असून सरकारने या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

ही वेळ येणारच होती

सध्या आयटी क्षेत्रात सुरू असलेली नोकरकपातीची समस्या फार गुंतागुंतीची आहे. याला कंपन्या, कर्मचारी, परदेशातील बदलती धोरणे असे सर्वच घटक जबाबदार आहेत. देशातील आयटी क्षेत्र हे बहुतांश सेवा पुरविण्यावरच अवलंबून आहे. काही बडय़ा कंपन्या उत्पादने करत आहेत. मात्र त्याची संख्या फारच कमी आहे. सुरुवातीच्या काळात आपल्याकडे मागणी जास्त होती; पण पुरवठा मात्र कमी होता. यामुळे गलेलठ्ठ पगार देऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर दरवर्षी भरघोस वाढ, विविध सेवासुविधा दिल्या जाऊ लागल्या; पण या क्षेत्रात चीनसारख्या देशांनी उडी घेतली तशी या क्षेत्रातील स्पर्धा वाढू लागली आणि कंपन्यांना कमी पैशांत किंवा आहे त्याच पैशांत कामे करून द्यावी लागली. परिणामी खर्चात कपात करण्याची गरज भासू लागली. मग कंपन्यांनी मनुष्यबळावरील खर्चही कमी करण्यास सुरुवात केली. कंपन्यांनी वर्तमानातील गरज ओळखून कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार देऊन नोकऱ्या दिल्या. मग गरज संपल्यावर त्यांच्या हातात नारळ दिला, तर दुसरीकडे कर्मचारीही अद्ययावत तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी कंपन्यांवरच अवलंबून राहू लागले. यामुळे त्यांचाही विकास खुंटला. प्रत्यक्षात आपल्या करिअरसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने वेतनातील काही रक्कम खर्च करणे अपेक्षित आहे. तसे होत नाही. यामुळे अशा वेळी अशा कर्मचाऱ्यांचा बळी जातो.    – दीपक गाडेकर, मनुष्यबळ विकासतज्ज्ञ