डेंग्यूने मुंबईत थैमान मांडले असतानाच बोरिवली भागात १६ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची अंडी (लाव्र्हा) आढळल्याने स्वच्छतेबाबतची अनास्था उघडकीला आली आहे. पालिकेचा आरोग्य विभाग या संदर्भात खबरदारी घेण्यास अपयशी ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे, तर आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याची पालिकेची भूमिका आहे.
डेंग्यूने आतापर्यंत महानगरात १८ जणांचा बळी घेतला आहे, मात्र पालिकेने डेंग्यूने केवळ १२ जण मरण पावल्याचा दावा केला आहे. इतरांच्या मृत्यूची कारणे वेगळी असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डेंग्यूबाबत पालिका जनजागृती मोहीम राबवत असून त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत, परंतु मुंबईकरांवर या मोहिमेचा विशेष परिणाम होत नसल्याचे दिसत आहे.महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी बोरिवली भागात ९७ ठिकाणी तपासणी केली व त्यात १६ जागी डेंग्यूचे लाव्र्हा आढळले. गंमत म्हणजे दोन आठवडय़ांपूर्वी ज्या ठिकाणी पालिकेने जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता, त्या ठिकाणाजवळच डासांची अंडी आढळल्याने पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांवर स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप लावला आहे. बोरिवलीतील लता हाऊसिंग सोसायटीत १२ ठिकाणी, तर राजेवाडी चाळीत ४ ठिकाणी अंडी सापडली.