शीना बोरा हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या पत्नीचा आज सकाळी निर्घृण खून झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर त्यांचा मुलगा गायब आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

मुंबई येथील सांताक्रूझ पश्चिम भागात राहणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे हे सकाळी सांताक्रूझच्या प्रभात कॉलनीतील आपल्या घरी आले असताना, त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी पत्नी दीपाली यांना फोन केला असता, तो बंद लागला. यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. या वेळी त्यांना दिपाली या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्या. गणोरेंनी लगेचच १०० क्रमांकावरून पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर दीपाली गणोरे यांना तातडीने व्ही. एस. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ज्ञानेश्वर गणोरे हे शीना बोरा हत्येचा तपास करत असल्याचे सांगण्यात येते. ते मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या तपासाच्या आधारवरच मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. आपल्या पत्नीच्या हत्येचा गणोरे यांना धक्का बसल्याचे सांगण्यात येते. पोलीस पुढील तपास करत आहेत.