पती घरी मद्यपान करून आल्याने संतप्त झालेल्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले. या दुर्घटनेत ही महिला ९० टक्के भाजली असून पतीही गंभीर भाजला आहे. घाटकोपरच्या पंतनगर येथे ही घटना घडली
 पंतनगर येथील गुरुनानक नगर येथे बाबू गुप्ता (२५) हा पत्नी रेखा आणि सहा महिन्यांच्या मुलीसह रहातो. त्याला मद्यपानाची सवय होती. त्यावरून त्यांच्यात भांडण व्हायचे.
गुरुवारी त्यांच्या वसाहतीत एका लग्नानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. त्यात बाबू मद्यपान करून आला. त्यामुळे रेखा संतप्त झाली आणि त्यांच्यात भांडण झाले. या भांडणात तिने घरातील रॉकेल अंगावर टाकून स्वत:ला पेटवून घेतले. तिला वाचविण्यासाठी बाबू मध्ये पडला. मात्र तो सुद्धा आगीत भाजला. घरात असलेली त्यांची सहा महिन्यांची मुलगीही या आगीत १० टक्के भाजली.
शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविल्यांतर या दोघांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. ९० टक्के भाजलेली रेखा आणि तिचा ७० टक्के भाजलेला तिचा पती बाबू मृत्यूशी झुंज देत आहेत.