वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर आता वायफायवर चालणारे कॅमेरे

मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर आता वायफायवर चालणारे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहन चालकासोबतच वाहतूक पोलिसाचे वर्तनही कॅमेऱ्यात बंदिस्त होणार आहे.

वाहतूक पोलिसांचे नेहमीच वाहनचालकांशी खटके उडत असतात. अनेकदा कारवाईदरम्यान चालक वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात. याउलट कधी कधी वाहतूक पोलिसांच्या विरोधात चालकांच्या तक्रारी असतात. गेल्या वर्षी वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना तरुणांच्या मारहाणीत जीव गमवावा लागला होता. त्यानंतर वाहतूक पोलिसांची सुरक्षा ऐरणीवर आली होती. या कॅमेऱ्यांमुळे वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

नेहमीच्या वॉकी-टॉकीसह वाहतूक पोलिसांना हा वायफायवर चालणारा कॅमेराही सोबत बाळगावा लागणार आहे. या कॅमेऱ्यात रस्त्यावरील वाहतूक पोलिसाचे प्रत्येक वाहन चालकांसोबतच्या संभाषणाची नोंद होणार आहे आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करण्यात येणार आहे.

एखादी व्यक्ती पोलिसांशी जे काही संभाषण करेल ते सर्व ध्वनिचित्रीकरण होऊन थेट नियंत्रण कक्षाकडे जाणार आहे. कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून या माहितीचा वापर केला जाईल. त्यामुळे चालक आणि पोलीस या दोघांनाही यापुढे जबाबदारीने वागावे लागणार आहे.

एडिटची सोय नाही

सुरुवातीला शहरात १०० कॅमेऱ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. ध्वनिमुद्रित (रेकॉर्ड) केलेल्या चित्रफितीत कोणताही बदल करता येऊ नये, यासाठी ‘एडिटिंग’ची सोय याच्यात नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या वाहतूक विभागाकडे हायड्रोलिक व्हॅन आहेत. यातही कॅमेरा आणि मेगा फोन आहेत. एखादे वाहन टोइंग करताना त्यावरून घोषणा केली जाते. त्यानंतर आलेल्या या कॅमेऱ्यांमुळे वाहतूक नियंत्रणाच्या कामात अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे.

ज्या भागात अधिक तक्रारी येतात अशा ठिकाणी आणि संवेदनशील भागात या कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.

अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त, वाहतूक विभाग