दहीहंडी फोडण्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या थरामध्ये १२ वर्षांखालील मुलांच्या समावेशास बंदी करण्याच्या निर्णयावर ‘बाल हक्क संरक्षण आयोग’ ठाम राहिल्यामुळे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या गोविंदा पथकांच्या बैठकीत कोणताच तोडगा निघू शकला नाही. परिणामी वेळप्रसंगी या उत्सवावरच बहिष्कार घालू, असा इशारा संतप्त गोविंदा पथकांच्या प्रमुखांनी दिला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी सध्याकाळी ५.३० वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परळ येथील कार्यालयात गोविंदा पथकांची बैठक होणार आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या थरात १२ वर्षांखालील मुलांचा वापर करणाऱ्या गोविंदा पथकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आयोगाने पोलिसांना दिले आहेत. दहीहंडी फोडण्याच्या आनंदापासून लहान मुलांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न आयोग करीत असल्याचा आरोप गोविंदा पथकांकडून करण्यात येत होता. अखेर वैद्यकीय आरोग्य शिक्षण आणि फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यस्थी करून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात सोमवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आयोगाचे सचिव त्रिपाठी आणि विविध गोविंदा पथकांचे प्रमुख उपस्थित होते. आयोगाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे त्रिपाठी यांनी या बैठकीत स्पष्ट केले. पोलीस आणि जनमताचा आढावा घेऊन हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने आयोगाच्या निर्णयावर योग्य तो तोडगा काढावा. मात्र सरकारने तोडगा काढला नाही आणि आयोग आपल्या निर्णयावर ठाम राहिले, तर आम्हाला दहीहंडी उत्सवावरच बहिष्कार टाकावा लागेल, असा इशारा दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे बाळा पडेलकर यांनी दिला.
राज्य सरकारने आयोगाच्या निर्णयावर योग्य तो तोडगा काढावा. मात्र सरकारने तोडगा काढला नाही आणि आयोग आपल्या निर्णयावर ठाम राहिला, तर आम्हाला दहीहंडीवरच बहिष्कार टाकावा लागेल.
बाळा पडेलकर,दहीहंडी उत्सव समन्वय समिती