मराठी रंगभूमीवरील नवे नवे प्रयोग एकांकिकेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असतात. मात्र हे प्रयोग फक्त स्पर्धेपुरते मर्यादित राहतात. त्यांना स्पर्धेबाहेर काढून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांपर्यंत आणले पाहिजे. त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले.
लोकांकिका महाअंतिम फेरी ऐन भरात सुरू असताना दोन एकांकिकांदरम्यान विनोद तावडे यांनी नाटय़रसिकांशी थेट संवाद साधला. मराठी रंगभूमीवर महाविद्यालयीन पातळीवर एकांकिकांच्या माध्यमातून अतिशय वास्तववादी प्रश्न सातत्याने मांडले जातात. शासनातर्फे आयोजित राज्य नाटय़स्पर्धातून दरवर्षी महाराष्ट्राचा सांस्कृतिक लसावि काढला जातो. या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट तीन किंवा चार नाटकांचा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये नाटय़ महोत्सव आयोजित करण्याचा मनोदयही तावडे यांनी व्यक्त केला. राज्यातील अनेक उद्योजकांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून एक टक्का रक्कम सांस्कृतिक कार्यक्रमांना देण्याचे मान्य केल्याची माहितीही त्यांनी दिली. कलेला राजाश्रय आवश्यक आहेच, मात्र त्याची जाहिरातबाजी व्हायला नको, तरच कला पुढे जाईल. या विचाराने शासन या सर्व उपक्रमांना फक्त प्रोत्साहन देईल, त्यात ढवळाढवळ करणार नाही. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना मंत्री उपस्थित असतील, पण कलावंताचा सत्कार एका कलावंताच्या हस्तेच करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा स्थापन करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.