माजी केंद्रीय गृहसचिव आणि भाजप खासदार आर. के. सिंह यांनी मुंबई पोलीसांवर केलेले आरोप गंभीर असून, त्यामध्ये काही तथ्य आढळले तर राज्य सरकार याची चौकशी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. मुंबई पोलीस दलातील कोणताही अधिकारी चौकशीमध्ये दोषी आढळला, तर त्याला पोलीस सेवेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळेच दाऊद वाचला!
पाकिस्तानात लपून बसलेल्या कुख्यात दाऊद इब्राहिमला संपविण्यासाठी योजना आखली होती, मात्र मुंबई पोलीस दलातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे याची बातमी दाऊदला मिळाल्याने त्याने आपला ठिकाणा बदलल्याचा दावा आर. के. सिंह यांनी केला होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ‘पीटीआय’ला ही माहिती दिली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना दाऊदला पाकिस्तानात घुसून मारण्याची योजना बनविण्यात आली होती. यासाठी छोटा राजन टोळीतील काही गुंडांची मदत घेण्यात येत होती. त्यांचे एका अज्ञातस्थळी प्रशिक्षणदेखील सुरू होते. याच वेळी डी-कंपनीशी संबंध असलेले पोलीस अधिकारी प्रशिक्षण सुरू असलेल्या ठिकाणी अटक वॉरंट घेऊन दाखल झाले. यामुळे ही योजना फसल्याचे सिंह यांनी सांगितले.