पावसाच्या शिडकाव्यानंतर तापमापकातील पारा पुन्हा एकदा वर चढल्याने मुंबईकरांना गेले दोन दिवस घाम फुटला आहे. एकीकडे वाऱ्याची दिशा बदलत असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भ व मराठवाडय़ात थंडीचा शिरकाव होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असला तरी मुंबईकरांची मात्र आणखी काही दिवस उन्हाच्या चटक्यांपासून सुटका नाही.
ढगाळ वातावरणामुळे शहरातील दुपारचे तापमान उणावले होते. मात्र कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता कमी झाल्यावर मंगळवारपासूनच तापमानाने पुन्हा उसळी घेतली. शनिवारी २९ अंश सेल्सिअसवर घसरलेले तापमान मंगळवारी ३५ अंश से. तर बुधवारी ३५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. रात्री पूर्वेकडून जमिनीवरील थंडी घेऊन येणारे वारेही क्षीण झाल्याने रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसनी वाढले आहे.